मुंबई : मुंबईतील आरे कॉलनीत रॉयल पामजवळ हेलिकॉप्टर कोसळलं आहे. कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली आहे. आरे कॉलनीतील मैदानात कोसळल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे. मात्र हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या चौघांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तर तीन गंभीर जखमी आहेत.


कोसळलेलं हेलिकॉप्टर जुहू एअर बेसवरुन 12 वाजताच्या सुमारास निघालं होतं. जॉय राईडसाठी हेलिकॉप्टर ठाणे परिसरात गेलं होतं. ठाण्यावरुन परतत असताना फिल्टर पाडा परिसरात हे हेलिकॉप्टर कोसळलं. या हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या चौघांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात अग्नीशमन दलाला यश आलं आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर अमन एव्हिएशन या खासगी कंपनीचं असल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातून परतत असताना क्लचमध्ये बिघाड झाल्याचं पायलटच्या लक्षात आलं. पायलटनं फिल्मसिटीच्या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला हेलिपॅडवर उतरता न आल्यामुळे पायलटनं एमर्जन्सी लँडिग केलं. यावेळी हेलिकॉप्टर कोसळून त्याला आग लागली.

हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या चौघांपैकी दोघेजण पायलट होते, तर दोघे जॉय राईडसाठी आलेले प्रवासी होते. दरम्यान हेलिकॉप्टर कोसळल्यानं चौघेही जखमी झाले होते. चौघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.  सर्व जखमींना सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. एअरफोर्सची टीम आणि स्थानिक प्रशासनाकडून मदत पुरवली जात आहे. अपघात झालेलं ठिकाण रस्त्यापासून लांब असल्यामुळे मदतकार्यात अडथळेही येत आहेत.