नवी मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा सुरु होताच सायन-पनवेल हायवेवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे. दिवस आणि रात्रभर या मार्गावर तुर्भे ब्रिजजवळ आणि इतर ठिकाणी चार ते पाच किमीच्या रांगा लागत आहेत.

सहा महिन्यांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून या रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आले. मात्र योग्यरित्या काम न केल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे मुंबई-पुणे हायवेला दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत आहे.



खारघर, सीबीडी, सानपाडा, तुर्भे येथे लांबच लांब रांगा लागत आहेत. सहा महिन्यांपूर्वी अंडर 17 फीफा विश्वचषकाच्या तयारीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले होते. मात्र ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं काम केल्याने सहा महिन्यातच रस्त्याची चाळण झाली आहे.



या खड्ड्यांमुळे अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. दोन दिवसांपूर्वीच एका दुचाकीस्वाराचा पडून मृत्यू झाल्याची घटनाही घडली होती. त्यामुळे या रस्त्याला कुणी वाली आहे का, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.