मुंबई : बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या परवानग्या या वर्षीपासून ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज देताना गणेशोत्सव मंडपाचा आकार, रस्त्यासंबंधीच्या बाबी याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या अटींसापेक्ष या परवानग्या देण्यात येणार आहेत.

यानुसार येत्या 15 जुलैपासून सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांना संबंधित परवानग्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीसांची 'ना-हरकत' मिळताच मंडळांना महापालिकेद्वारे योग्य ती परवानगी देण्यात येणार आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन परवानगी देण्याबाबत महापालिकेच्या विभाग स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना सुयोग्य माहिती व्हावी, यादृष्टीने महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे लवकरच विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

याच प्रशिक्षणादरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या परवानग्यांच्या कायदेविषयक बाबींचेही प्रशिक्षण सत्र महापालिकेच्या विधी खात्याद्वारे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे गणेश मंडळांचा मोठा ताण वाचणार आहे.