मुंबई : मुंबईत येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसेच मुंबईच्या समुद्रात उधाणाची भरती असून आज सकाळी 11.50 मिनिटांनी  4.68 मीटरपर्यंत लाटा उसळण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे समुद्रकिनारी न जाण्याचाही इशारा देण्याता आला आहे.  मध्यरात्रीपासून मुंबई शहरात 77.0 मिमी तर उपनगरात 117.8 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.


दरम्यान, कालपासून (रविवार) मुंबईसह राज्यात पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बळीराजाही सुखावला आहे. आज सकाळपासूनच मुंबईतही पावसाची संततधार सुरुच आहे. तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील अनेक धरणांचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्य पाण्याची चिंताही मिटली आहे.

मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी

लातूर जिल्ह्यात काल शनिवारी 5 वाजल्यापासून पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात झाली. लातूर शहर आणि परिसर औसा, उदगीर, औरंद, शाहजानी, रेणापूर, जळकोटसह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावली. याशिवाय, उस्मानाबाद, तुळजापूर, परांडा आदी भागातही पावसाची रिपरिप सुरु आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु

दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि कोयना परिसरात पाऊसाचं पुनरागमन झालं आहे. शनिवार रात्रभर बरसलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात एक टीएमसीने वाढ झाली आहे. सोलापुरातही पावसाची रिपरिप सुरु आहे. तर सांगली परिसरातही पावसाची संततधार सुरु आहे.

दरम्यान, येत्या चार दिवसात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. त्यानुसार पावसानं कमबॅक केल्यानं हवामान खात्याचा अंदाज तंतोतंत खरा ठरल्याचं मानलं जात आहे.

संबंधित बातम्या :

तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, भातसा धरणांचे दरवाजे उघडले!