मुंबई : येत्या 24 तासात ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईत सध्या पावसाचा जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी सुरुच आहेत. दरम्यान आज मुंबईच्या समुद्रात 12 वाजून 16 मिनिटांनी 4.90 मिटरच्या लाटा उसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
समुद्राच्या उंच लाटांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर समुद्रकिनारी गर्दी करतात. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
गुरुवारी कोकण-गोव्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासात कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
12 जुलै म्हणजे काल पडलेल्या पावसाची विभागवार आकडेवारी
- कोकण विभागात सरासरी 30.7मिमी पाऊस होतो. तिथे 81.6 मिमी म्हणजे सरासरीच्या 166 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
- मध्य महाराष्ट्रात सरासरी 8.7 मिमी पाऊस पडतो. तिथे 10.1 मिमी म्हणजे सरासरीच्या 25 टक्के कमी पाऊस नोंदवला गेला.
- मराठावाड्यात सरासरी 5.8 मिमी पाऊस होतो. तिथे 2.9 मिमी म्हणजेच सरासरीच्या 50 टक्के कमी पाऊस झाला आहे.
- विदर्भात सरासरी 10.8 मिमी पाऊस होतो. तिथे 19.4 मिमी म्हणजेच 79 टक्के जास्त पाऊस झाला आहे.
- संपूर्ण राज्यात सरासरी 11 मिमी पाऊस पडतो. तिथे यंदा 18.9 मिमी म्हणजेच सरासरीच्या 72 टक्के जास्त पावसाची नोंद झाली.