मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबातील आणखी एका सदस्याचं पदार्पण होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे लवकरच राजकारणात ग्रँड एंट्री करण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अमित ठाकरेंना लवकरच एखादी राजकीय जबाबदारी दिली जाऊ शकते.


पक्षातील नेत्यांच्या मागणीमुळे अमित ठाकरेंवर जबाबदारी सोपवली जाणार असल्याची शक्यता आहे. यासाठी पक्षात तयारी सुरु आहे. पक्षाची कार्यपद्धती समजून घेण्यासाठी अमित ठाकरे मुंबईतील विविध शाखांना भेट देत आहेत आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

ठाकरे कुटुंबीयांमध्ये अगोदर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, नंतर उद्धव आणि राज ठाकरे आणि आता तिसऱ्या पिढीची एंट्री होणार आहे. तिसऱ्या पिढीमध्ये सर्वात अगोदर आदित्य ठाकरे यांनी एंट्री केली. त्यांच्यानंतर आता अमित ठाकरेही राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत.



मुंबईतील डीजी रुपारेल कॉलेजमधून ग्रॅज्युएट असलेले अमित ठाकरे सध्या राजकारणापासून दूर आहेत. मात्र त्यांना राजकारणात आणण्याची मागणी जोर धरत आहे. गेल्या महिन्यातच झालेल्या पक्षाच्या बैठकीत बाळा नांदगावकर यांच्यासह इतर नेत्यांनी अमित ठाकरेंना राजकारणात आणण्याची मागणी केली. ज्यानंतर राज ठाकरे यांच्या आदेशानुसार अमित ठाकरे मुंबईतील कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेत आहेत.

अमित ठाकरे यांच्या राजकारणातील एंट्रीवर पक्षातील कुणीही बोलायला तयार नाही. मात्र अमित ठाकरे यांची जी लोकप्रियता आहे, तिला राजकारणाशी जोडलं जावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. 2012 साली महापालिका निवडणुकीत अमित ठाकरे प्रचार करताना दिसून आले होते. मात्र त्यांच्यावर कोणती जबाबदारी नव्हती. पुन्हा 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मनसेसाठी प्रचार केला होता.



अमित ठाकरेंनी सोशल मीडियाचाही वापर सुरु केला आहे. 2017 मध्ये महापालिका निवडणुकांच्या काळात ते आजारी होते. मात्र आजारातून बाहेर पडल्यानंतर ते आता सक्रिय राजकारणात दिसून येत आहेत. याचवर्षी त्यांचा बालपणाची मैत्रिण फॅशन डिझायनर मितालीसोबत साखरपुडा झाला आहे. अमित ठाकरे आता विद्यार्थ्यांच्या विषयांना हाताळताना दिसत आहेत.

अमित ठाकरेंनी आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या स्वभावात मोठा फरक असला तरी ते काही गोष्टींमध्ये वडिलांच्या मागे नाहीत. अमित ठाकरेही एक चांगले व्यंगचित्रकार असून स्केचिंगही करतात. ते फुटबॉल प्रेमी असून स्वतः फुटबॉल खेळतात.

फुटबॉल स्टार रोनाल्डिनोला भारतात आणण्यात अमित ठाकरेंची मोठी भूमिका होती. ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेतून राजकारणाची सुरुवात केली, त्याच पद्धतीने अमित ठाकरेही मनसे विद्यार्थी सेनेतून राजकारणात एंट्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती राज ठाकरे यांच्या निर्णयाची...