मुंबई: मुंबईतील सांताक्रूझ स्टेशनवर एकाच वेळी दोन पुलाचं काम सुरु असल्यामुळे मोठी गर्दी पाहायला मिळतेय. सकाळच्या वेळेत रेल्वे पोलीस स्वत: पुलावर उभं राहून गर्दी नियंत्रित करताना दिसतात.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दिवसाला 75 ते 80 लाखांच्या दरम्यान प्रवासी प्रवास करतात. या प्रवासात प्रवाशांना सर्वाधिक गर्दीचा सामना पादचारी पुलांवरच करावा लागतो. अपुऱ्या आणि अरुंद पुलांवरून प्रवाशांना चालणेही कठीण होते. पूर्वीचं एल्फिन्स्टन रोड आणि सध्याचं प्रभादेवी स्थानकातील पादचारी पुलावर घडलेल्या चेंगराचेंगरीनंतर पादचारी पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर तात्काळ 44 पूल रेल्वेमंत्र्यांकडून मंजूर करण्यात आले.
सध्याच्या घडीला पश्चिम रेल्वे मार्गावर 109 पादचारी पूल आहेत. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील दुर्घटनेनंतर रेल्वेमंत्री मुंबईत दोन दिवस तळ ठोकून होते. मुंबईतील प्रस्तावित प्रकल्पांची माहिती घेतानाच पुलांचाही आढावा त्यांनी घेतला होता. त्यावेळी तात्काळ 44 नवीन पुलांना मंजुरी त्यांच्याकडून देण्यात आली. त्यापैकीच हे दोन पूल आहेत या पुलाचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत सांताक्रूझ पुलावर गर्दी पाहायला मिळेल.