मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या उष्ण लहरींमुळे मुंबई आणि कोकणवासी घामाघूम झाले आहेत. शनिवारी मुंबईचा पारा 38.6 अंशावर होता, तर रत्नागिरीत 39.3 आणि वेंगुर्ल्यात 37 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
पुढील काही काळ हा पारा वाढत जाईल, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. मुंबई आणि कोकणाला उष्णतेची झळ पोहचणार आहे. कोरडे हवामान, कमी उंचीवरुन वाहणारे वारे हे हिवाळा संपून उन्हाळा सुरु झाल्याचे संकेत असल्याचं वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे.
वेधशाळेच्या माहितीनुसार अरबी समुद्रात प्रति चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागराकडून पश्चिम भारतात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांचा जोर वाढला आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीलगतच्या गावांमध्ये अचानक उष्णता वाढली आहे.
रत्नागिरीत शनिवारी नोंद झालेलं 39.3 अंश तापमान हे सर्वोच्च आहे. 25 फेब्रुवारी 1945 रोजी रत्नागिरीतील सर्वोच्च तापमान 38.3 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं होतं.