Santosh Parab Case :  भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी बुधुवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. आज नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावनी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंना 11 जानेवारीपर्यंत अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी असलेले भाजप आमदार नितेश राणे आणि माजी जि.प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  


शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे मुख्य सूत्रधार नितेश राणेच आहेत, असा दावा राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी याप्रकरणी राज्य सरकारच्यावतीनं प्रतिज्ञापत्र उशिरानं हायकोर्टात सादर केलं. त्यामुळे यावर उत्तर देण्यासाठी नितेश राणे यांच्या वकिलांनी कोर्टाकडे वेळ मागितला. ही मागणी स्वीकारत न्यायमूर्ती सी. वी. भडंग यांनी या प्रकरणावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब केली आहे. मात्र तोपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून संरक्षण देण्यात यावं अशी मागणी त्यांच्यावतीनं कोर्टाकडे केली. यावर सिंधुदुर्ग पोलिसांनी पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर कोणतीही कठोर कारवाई करणार नाही अशी दिलेली तोंडी हमी कायम ठेवली आहे. त्यामुळे 11 जानेवारीपर्यंत नितेश राणेंना अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे.
  
संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्‍ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयानं नितेश राणेसंह अन्य एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्या निकालाला नितेश राणे यांच्यावतीनं अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. नुकत्याच पार पडलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत संतोष परब यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला. हा हल्ला आमदार नितेश राणे यांच्या सांगण्यावर झाल्याचा आरोप करून तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आयपीसी कलम 307 (हत्येचा प्रयत्न), कलम 120 (बी) (गुन्हेगारी कट रचणे), कलम 34 (समान उद्देश) अंतर्गत गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आपल्यालाही अटकेची शक्यता निर्माण झाल्याने नितेश राणे आणि संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. या अर्जावर दोन दिवस युक्तीवाद झाल्यानंतर जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. ज्यात आरोपी तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप करत त्यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज असल्याचा राज्य सरकारचा दावा हायकोर्टानं स्वीकारला होता.


दरम्यान, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आदित्य ठाकरेंना 'म्याँव म्याँव' करून चिडवल्यानंतर अवघ्या काही तासांत हा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे निव्वळ राजकीय सूडबुद्धीनं आणि सरकारचा दबाव असल्यानं या प्रकरणात आपल्याला गोवलं जात असल्याचा दावा आमदार नितेश राणे यांनी आपल्या अटकपूर्व अर्जातून केलेला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: