मुंबई :  परमबीर सिंह यांच्यासह फरार घोषित करण्यात आलेल्या आणखीन एका सहआरोपीला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. विनय सिंहपाठोपाठ रियाझ भाटी यालाही फरार आरोपी घोषित केल्याचा आदेश हायकोर्टानं रद्द केला आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांच्याही याबाबत सकारात्मक आशा वाढल्या आहेत. राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये खंडणीचे गुन्हे दाखल असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा निकटवर्तीय रियाझ भाटी याला परमबीर यांच्यासह मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयानं फरार घोषित केले होतं. या आदेशाला भाटीनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. हायकोर्टानं या याचिकेची दखल घेत रियाझ भाटीला फरार घोषित करण्याचा आदेश रद्द केला आहे. याआधी 1 डिसेंबर रोजी याच प्रकरणातील अन्य आरोपी विनय सिंह यालाही फरार घोषित करण्याचा आदेश हायकोर्टानं रद्द केला होता.


खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात परमबीर सिंह, रियाज भाटी आणि विनय सिंह यांना आरोपी दाखवण्यात आलं आहे. रियाझ भाटीवर आयपीसी कलम 384, 385, 388, 388, 120 ब आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून हा तपास नंतर सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आला. दरम्यान सीआयडीनं या तिन्ही आरोपींविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं.


मात्र पोलिसांनी अटकपूर्व जामीनावर आपल्याला सोडून द्यावे तसेच खटला पूर्ण होत नाही तोपर्यंत पोलिसांना अटक न करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश द्यावेत अशी मागणी करत रियाझ भाटीनं हायकोर्टात ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांच्यावतीनं कोर्टाला सांगितलं गेलं की फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार प्रक्रिया न पाळता फरार घोषित करण्यात आले. कायद्यानुसार फरार घोषित करण्यापूर्वी आरोपीला 30 दिवसांची रितसर नोटीस देणं आवश्यक आहे. तसेच गुन्हा झाला तेव्हा सिंहनं मुंबई सत्र न्यायालयात तसेच मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता असे न्यायालयाला सांगण्यात आलं. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत दंडाधिकारी न्यायालयानं रियाझ भाटी याला फरार घोषित करण्याचा आदेश रद्द केला.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या बातम्या :