मुंबई : मनी लाँडरिंग कायद्याखाली अटकेत असलेले समीर भुजबळ यांचा जेलमधील मुक्काम वाढला आहे. व्यस्त कामकाजामुळे सुट्टीकालीन न्यायालयाने तूर्तास त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांना पुढील सुनावणीपर्यंत जेलमध्येच रहावं लागणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने समीर भुजबळ यांना अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर पुढील आठवड्यात 21 मे रोजी सुनावणी होणार आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या छगन भुजबळ यांना नुकताच जामीन मिळाला. त्यामुळे समानतेच्या मुद्यावर आपल्यालाही जामीन देण्यात यावा अशी मागणी समीर भुजबळ यांनी केली होती.
सुप्रीम कोर्टाने पीएमएलए कायद्यातील कलम ४५ घटनात्मकदृष्ट्या वैध नसल्याचा निकाल दिल्यानंतर आत्तापर्यंत ५३ जणांना जामीन देण्यात आला असून केवळ आपणच जामिनापासून वंचित असल्याचा युक्तीवाद समीर भुजबळांतर्फे करण्यात आला होता. पण हायकोर्टाने समीर यांना कोणताही दिलासा न देत सुनावणी 2१ मे रोजी ठेवली आहे. तसेच पुढील सुनावणीला ईडीला त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.