मुंबई : मुंबईच्या मानखुर्दमध्ये मंडाळा झोपडपट्टीला मोठी आग लागली आहे. संध्याकाळी लागलेली ही आग विझवण्यासाठी गेले दोन तास शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळे येत आहेत. ही आग केमिकल साठ्यामुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.


मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीमध्ये आज संध्याकाळी आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या 8 गाड्या दाखल झाल्या होत्या, पण आग मोठी असल्यानं आता 17 अग्नीशमन दलाच्या गाड्या आणि 10 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसंच आता अन्य ठिकाणांहूनही गाड्या मागवण्यात आल्या आहेत. तसंच 2 ईएमएस आणि 5 अँब्युलन्सही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मानखूर्दच्या मुंबई-वाशी रस्त्यावरील ट्रॉम्बे नाक्याजवळ ही आग लागली आहे. आगी लागलेली झोपडपट्टी हायवेच्या अगदी जवळ असून चिचोळ्या आणि अरुंद गल्ल्यांमुळे अग्नीशमन दलाच्या गाड्यांना आगीच्या जवळ जाण्यास अडथळे येत आहेत. रहिवासी परिसर असल्यानं आगीत सिलेंडरचे स्फोटही झाल्याचं दिसत आहे.

घटनास्थळी अग्नीशमन दलासह मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. आगीचं कारण अस्पष्ट असून जीवितहानीची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. लोकांनी आपल्या मौल्यवान वस्तु घराबाहेर आणल्या आहेत. तसंच स्थानिक नागरिकांनी दरवर्षी अशाप्रकारे आग लागते, पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान या आगीत दोघेजण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांनाही शताब्दी आणि राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

झोपडपट्टीतील नागरिकांची राहण्याची व्यवस्था तीन शाळांमध्ये करण्यात आली आहे.

मानखुर्दच्या मंडाळा झोपडपट्टीतील आगीवर 5 तासांनतरही नियंत्रण नाही, एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल