मुंबई : मुंबईतील रेल्वेस्थानकांशेजारी आता एका रुपायात आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ‘मँजीकडील’ या आरोग्य सेवा देणाऱ्या कंपनीने मध्य रेल्वेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरु केला आहे.
मध्य रेल्वेने मुंबईतील 19 रेल्वेस्थानकांवर हा उपक्रम सुरु करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची जागा उपलब्ध करुन दिली आहे. सध्या दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड या स्थानकांवर ही रुग्णालयं सुरु करण्यात आली आहेत.
काही दिवसांतच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटनही करण्यात येणार आहे. मात्र, उद्घाटनाआधीच रुग्णांची या रुग्णालयांबाहेर रांग लागली आहे.
या रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांकडून अवघ्या एका रुपयात आजाराचे निदान आणि सल्ला घेणं शक्य होणार असून, तातडीची आरोग्यसेवाही या ठिकाणी मोफत देण्यात येईल.
इसिजी, ब्लड शुगर तपासणी, नेबोलायझर ट्रिटमेंट, सर्व प्रकारचे ड्रेसिंग, रक्तदाब तपासणी, सलाईन या आरोग्य सेवा केवळ 50 ते 100 रुपयांत दिल्या जात आहेत. त्याचसोबत 10 ते 20 टक्के स्वस्त दराने औषधे मिळण्याची सोयही या आरोग्य सेवा केंद्रात असणाऱ्या मेडिकलद्वारे उपलब्ध करुन दिली जात आहे.
रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या अपघातातील अपघातग्रस्तांना या सेवेमुळे तातडीची सेवा मिळणं शक्य होईल. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मध्यमवर्गीयांनाही या सुविधेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक आरोग्यकेंद्रावर 3 एमबीबीएस डॉक्टर, दोन ते तीन व्हिजिटिंग एमडी डॉक्टर उपलब्ध असतील. स्टेशनवर असणारी ही आरोग्य केंद्रं आणि मेडिकल 24 तास सेवा देणार आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमातील डॉक्टरांमध्ये तरुणांचा सहभाग मोठा आहे.
रेल्वेनं मोफत उपलब्ध करुन दिलेल्या जागेमुळे आणि रेल्वेस्थानकावरच असणाऱ्या कमी दरात औषधविक्री करणाऱ्या मेडिकलमुळे ‘मँजीकडील’ या कंपनीला अवघ्या एक रुपयात आरोग्य सेवा देणे शक्य झाले आहे.