मुंबई: उल्हासनगरात एक अनोखा सत्संग सुरु आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी या सत्संगात भाविकांना चक्क हेडफोन वाटण्यात आले आहेत.
सुसज्ज मंडप.. जवळपास 5 हजार भाविकांची गर्दी, पण सगळे चिडीचूप आणि तल्लीन. भल्यापहाटे इथं सत्संग सुरु आहे असं कुणी सांगितलं, तर त्यावर कदाचित आपला विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. कारण हा सत्संग सुरू आहे हेडफोन्सवर!
उल्हासनगरच्या गोल मैदानात सप्टेंबर महिन्यापासून 40 दिवस अमृत वेली परिवाराचा हा सत्संग चालतो. मागील अनेक वर्षांपासून चालणाऱ्या या सत्संगाची वेळ असते पहाटे पावणेचार ते पाच! शिवाय मैदानाच्या चारही बाजूंना रहिवासी भाग. त्यामुळं इतक्या पहाटे स्पीकर्स लावून सत्संग केला, तर परिसरातल्या लोकांची झोपमोड होण्याची भिती असते. शिवाय इतक्या पहाटे सत्संग केल्यानंतर त्यातून होणारं ध्वनीप्रदूषण वेगळंच.
त्यामुळं हे सारं टाळण्यासाठी यंदाच्या वर्षीपासून या सत्संगात खास हेडफोन्स तयार करण्यात आले आहेत. समोरच्या भव्य स्टेजवर शीख समुदायाचे संत भाईसाहब भजन आणि प्रवचन करतात, त्यांना वाद्यांचीही साथ असते. मात्र त्यांचा आवाज स्पीकरकडे न जाता तो जातो थेट भाविकांच्या हेडफोनमध्ये, आणि भाविकही कानात हेडफोन घालून सत्संगात तल्लीन होऊन साथ देतात.
या आगळ्यावेगळ्या सत्संगासाठी याठिकाणी वायफाय यंत्रणा उभारण्यात आली असून, त्यावर चालणारे 10 हजार विशेष हेडफोन्स तयार करुन घेण्यात आले आहेत. इथं आलेले सर्व भाविक हे विशेष हेडफोन घालून सत्संगात सहभागी होतात.
बरं फक्त मंडपातच बसलेल्या भाविकांना नाही, तर जगभरात असलेल्या अमृत वेली परिवाराच्या जवळपास 25 लाख अनुयायी आणि भाविकांना हा सत्संग थेट पाहता येण्याचीही व्यवस्था केली जाते. हे हेडफोन्स घालून सत्संगात सहभागी झाल्यानंतर आधीपेक्षाही अधिक आनंददायी अनुभव येत असल्याचं भाविक सांगतात. शिवाय या निर्णयाचं स्वागत करतानाच न्यायालयाचा सन्मान राखल्याचीही भावना भाविक व्यक्त करतात.
हा आगळावेगळा सत्संग येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 4 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री गुरु गोविंद सिंह यांचा जन्मसोहळा याठिकाणी होणार असून या सोहळ्याला जवळपास 1 लाख भाविक हजेरी लावतील, असं अंदाज आहे. मात्र इतकी प्रचंड गर्दी होऊनही इथं कुठलाही अनुचित प्रकार घडत नाही. त्यामुळं अमृत्वेली परिवाराची शिस्त आणि त्यांच्याकडून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी लढवण्यात आलेली ही अनोखी शक्कल, यांचं कौतुकच करावं लागेल.