एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. चार दिवसांपासून महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस आगारात थांबून आहेत. परिणामी दिवाळीच्या दिवसांत प्रवाशांचा खोळंबा होत आहे.
अखेर उद्धव ठाकरेंनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यामुळे एसटी कर्मचारी आज संप मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याशिवाय संप मिटल्यानंतर एसटी संघटनांचे कर्मचारी तसंच नेते मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' आणि उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री'वर जाऊन भेट घेणार आहे.
यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सरकारविरोधातील आंदोलनात सहभाग घेतला आहे. मग ते शेतकऱ्यांचं आंदोलन असो, महागाईविरोधातील आंदोलन असो किंवा नुकतंच झालेलं अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, उद्धव ठाकरे यांनी सरकारविरोधात तातडीने प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर असताना, दिवाळ सणात प्रवाशांचे प्रचंड हाल होत असताना, उद्धव ठाकरेंनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यामुळे उद्धव संपाबाबत कधी बोलणार याची प्रतीक्षा होती.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :
- एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
- पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
- जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी
एसटी कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जातेय : इंटक
राज्यातील विविध आगरातून कर्मचाऱ्यांना हकलवून दिलं जातंय, दमदाटी केली जातेय. सर्क्युलर काढून होमगार्ड्सची भरती करून एसटी काढल्या जात आहेत. कालच्या प्रस्तावानुसार आम्हाला 4 ते 5 हजार वेतन वाढ मिळेल, 12 ते 13 हजार रुपये पगारात आमच्या मूलभूत गरजा भागणार नाहीत. इतर राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे हीच आग्रहाची विनंती आहे. मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे, चर्चेसाठी बोलावलं तर आम्ही तयार आहोत, असं ‘इंटक’चे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले.
प्रशासनाचा कर्मचाऱ्यांविरोधात अध्यादेश
पगारवाढीसाठी घरदार सोडून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार पंढरपुरात समोर आलाय.
संपादरम्यान विश्रामगृहात आराम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चक्क अर्धनग्न अवस्थेत प्रशासनानं बाहेर काढलं. संपावरील कर्मचारी एसटीच्या विश्रांतीगृहाचा वापर करत होते. यावेळी परिवहनचे अधिकारी अचानक विश्रांतीग़हात धडकले आणि त्यांनी या कर्मचाऱ्यांना सरळ विश्रांतीगृहाच्या बाहेर हाकललं.
तिकडे सोलापुरात एसटीच्या विभागीय कार्यलयाने आदेश काढलाय की, संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करा.
सोलापुरातील राज्य परिवहन विभागीय कार्यलयाने पत्रक काढून 11 आदेशच जारी केले आहेत.
रावतेंविरोधात एसटी कर्मचाऱ्यांचा संताप
तिकडे धुळे शहरातमध्ये एसटी कर्मचारी आक्रमक झाले आणि त्यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावतेंच्या विरोधात अर्धनग्न आंदोल केलंय. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
तर कोल्हापुरातही एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाकर रावतेंचं पोस्टर फाडलंय. रावतेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलनही करण्यात आलंय.
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते मुर्दाबाद अशी घोषणाबाजी करण्यात आली.
खासगी वाहतूकदारांची चंगळ
दरम्यान सध्या एसटीचा संप सुरु असल्याने खासगी वाहतुकीला फायदा होतोय.प्रवासभाडं दुपटी-तिपटीने वाढवण्यात आलं आहे. कोकणातही हीच परिस्थिती पाहायला मिळत आहे.
माती लावून अभ्यंगस्नान
तर तिकडे नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध म्हणून उटण्याऐवजी माती लावून अभ्यंग स्नान केलं. हा संप मोडीत काढण्यासाठी प्रशासनानं राज्यभर विश्रामगृहाचं पाणी, शौचालय, स्वच्छतागृह आणि वीज बंद केली आहे. जे कर्मचाऱी आहेत. त्यांना विश्रामग्रहातून बाहेर काढलं जातंय. त्याचा निषेध म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी हे अनोखं आंदोलन केलं. तर दुसरीकडे एसटीच्या संपामुळं नाशिक आगारात अडकून पडलेल्या चालक आणि वाहकांसाठी दिवाळीच्या फराळाचं वाटप करण्यात आलं. बसस्थानकावर चिवडा फराळ खात या एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली.
संबंधित बातम्या
एसटी संप चौथ्या दिवशीही सुरुच
ब्लॉग : लालराणीचा राजा उपाशी
“एसटी कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृहाबाहेर काढा आणि गुन्हे दाखल करा”
उद्धव ठाकरेंचं एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का? : इंटकचा सवाल
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार?
प्रशासन एसटी संप चिघळवतंय: इंटक
अन्य राज्यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचा पगार किती?