मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या बाबतीत काय घडलं हा भाग सोडला तर तो जसा एक तरूण आणि उमदा कलाकार तर होताच पण त्याचसोबत तो एक चांगला माणूसही होता. 'एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमात त्यानं केलेलं काम सर्वांच्याच पसंतीस उतरलं होतं. असं मत गुरूवारी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे यांनी यासंदर्भातील एका सुनावणी दरम्यान व्यक्त केलं. सुशांतच्या बहिणींनी त्यांच्याविरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयानं आपला अंतिम निकाल राखून ठेवला आहे.

Continues below advertisement

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींविरोधात आलेल्या तक्रारीवरून आम्ही रितसर गुन्हा नोंदवला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आम्ही तो गुन्हा सीबीआयकडे सुपूर्दही केला आहे. सुशांतच्या मोबाईलवरून जी माहिती मिळालीय त्यात सुशांतच्या बहिणीनं त्याला बनावट प्रिस्क्रिप्शन बनवून एनडीपीएस कायद्यानं प्रतिबंधीत केलेली औषधं मिळवून दिल्याचे पुरावे मिळाले आहेत. ज्याचा तपास होणं गरजेचं आहे. तेव्हा गुन्हा नोंदवण्याचा आम्हाला काय अधिकार?, असा सवाल उपस्थित करणं चुकीचं असल्याचा दावा मुंबई पोलिसांतर्फे गुरूवारी हायकोर्टात करण्यात आला. मात्र सुशांत घेत असलेली औषधं प्रतिबंधित नाहीत, कोणताही डॉक्टर ती फोनवरही देऊ शकतो असा दावा सुशांतच्या बहिणींतर्फे मुंबई उच्च न्यायालयात गुरूवारी करण्यात आला.

रिया चक्रवर्तीचे आरोप

Continues below advertisement

तर आत्महत्येला प्रवृत्त करण्यापेक्षा एखाद्या व्यक्तीला आत्महत्येसाठी मदत करणं हा जास्त मोठा गुन्हा आहे, ज्यासाठी जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद आहे. असं सांगत जोपर्यंत आपण सुशांतसोबत होतो तोपर्यंत त्याला सांभाळतच होतो. रिया त्याच्या घरातून बाहेर पडली आणि काही दिवसांतच सुशांतनं हे टोकाचं पाऊल उचललं. यासाठी सुशांतच्या घरचेच जबाबदार आहेत, असा दावा करत आपण दाखल केलेल्या तक्रारीवर ठाम आहोत, असं रिया चक्रवर्तीच्यावतीनं जेष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टाला सांगितलं.

सीबीआयची भूमिका

रिया चक्रवर्तीनं सुशांतच्या बहिणींवर केलेले हे आरोप हा केवळ एक तिचा एक अंदाज आहे, त्यामुळे यावर मुंबई पोलिसांनी थेट गुन्हा कसा दाखल केला? तसेच सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे याची मुंबई पोलिसांना पूर्ण कल्पना होती त्यामुळे त्यांनी रियाची तक्रार परस्पर नोंदवून न घेता ती सीबीआयकडे पाठवायला हवी होती अशी भूमिका अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी सीबीआयच्यावतीनं हायकोर्टात स्पष्ट केली.

काय आहे प्रकरण?

सुशांत सिंह राजपूतच्या बहिणी प्रियंका व मीतू यांनी बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला प्रतिबंधीत औषधं देण्यात येत होती. त्यामुळे त्याची मानसिक आजार बळावला अशी तक्रार रिया चक्रवर्तीनं मुंबई पोलिसांना दिली आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. सुशांतच्या दोन्ही बहिणींनी हायकोर्टात धाव घेत ही एफआयआर रद्द करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. सुशांतची एक बहीण दिल्लीतील डॉक्टराच्या मदतीने बनावट प्रिस्क्रिप्शनच्या आधारे सुशांतला प्रतिबंधीत औषधं देत होती, असा आरोप रियानं केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे पोलीस स्थानकात 7 सप्टेंबर रोजी सुशांतच्या बहिणी प्रियंका सिंह आणि मीतू सिंह या दोघींवर गुन्हा दाखल केला आहे. न्यायमूर्ती एस. एस. शिंदे व न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंठपीठासमोर यावर सुनावणी पार पडली.