ठाणे : एकीकडे जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू मुळपदावर येत असतानाच काल (6 जानेवारी) ठाण्यात तब्बल सोळा पक्षी मृतावस्थेत सापडल्याने बर्ड फ्लूच्या शंकेने हाहाकार उडाला आहे. या पक्षांना तपासणीसाठी पुणे येथे पाठवले असता त्यांची बर्ड फ्लूची तपासणी निगेटिव्ह असल्याचे मंत्री सुनील केदार यांनी आज जरी सांगितले असले तरी या पक्षांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अजून अनुत्तरित आहे.


ही घटना आहे ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय गार्डन या गृहसंकुलातील, जिथे काल सकाळी फेरफटका मारण्यासाठी आलेल्या काही नागरिकांना एकामागोमाग एक असे पोंड हेरॉन म्हणजेच पाण बगळे मेलेले आढळून आले. सोबत 2 पोपट देखील याच परिसरात आढळून आले. या नागरिकांनी लागलीच पक्षी प्रेमींना बोलावले. एकाच वेळी एवढे पक्षी मेल्याने घटनास्थळी पोहोचलेले ठाणे महापालिकेचे पशु वैद्यकीय अधिकारी देखील बुचकळ्यात पडले. त्यांनी या पैकी 10 पक्षांचे मृतदेह मृत्यूच्या कारणाच्या चौकशीसाठी आधी देवनार आणि नंतर पुण्याला पाठवले.


Bird Flu: चिकन आणि अंडी खाण्यात काही धोका आहे का? केंद्रीय मंत्र्यांनी दिले उत्तर


सध्या देशाच्या अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूचे प्रमाण वाढत असून सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील अनेक शहरात अनेक पक्षी अचानक मृत्यमुखी पडले असून यामागे बर्ड फ्लूचे विषाणू असल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात बर्ड फ्लूने शिरकाव केल्याचे अधिकृत माहिती नसल्याने सदरचे सर्व पक्षी कशामुळे मेले यावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यावर पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी स्पष्टीकरण दिले.

या पक्षांचा मृत्यू जर बर्ड फ्ल्यूने नसेल तर इतर कोणत्या कारणामुळे झाला, याचा देखील शोध घेतला जात आहे. त्यांच्या खाण्यातून काही विषारी गोष्टी गेल्या असतील तर त्यांचा मृत्यू होऊ शकतो, असा कयास पक्षांचे डॉक्टर व्यक्त करत आहेत. सध्या ज्या राज्यात बर्ड फ्ल्यू पसरला आहे, तिथे काही नागरिक दिसेल त्या पक्षाला मारून टाकत आहेत. घरातल्या पक्षांना देखील सोडून देत आहेत. मात्र, असे न करता त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.


बर्ड फ्लूचा जरी रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी या पक्षांना मारणारा विषाणू कोणता? याचा शोध घेण्यासाठी त्यांना आता भोपाळ येथील मुख्य तपासणी केंद्रात पाठवण्यात आले आहे. त्याचा रिपोर्ट आल्यावरच या पक्षांचा खरा मारेकरी कोण हे उघडकीस येईल.


ठाण्यात 16 पक्षी मृतावस्थेत आढळले; पाणबगळे, पोपटांचा मृत्यू नेमका कशामुळे?