मुंबई : येस बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी कपिल आणि धीरज वाधवान यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिला आहे. सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणांत दोन्ही बंधूंनी हायकोर्टात जामीनासाठी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्यापुढे यावर सुनावणी झाली. दोन्ही बांजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर हायकोर्टानं आपला निकाल राखून ठेवला होता. याआधी ऑगस्ट महिन्यात ईडी तपास करत असलेल्या मनी लाँड्रींगच्या केसमध्ये वाधवान बंधूंना सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयनंही याच प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्यात दोघेही अटकेत असल्यामुळे त्यांची सुटका झालेली नाही.


दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटडेचे प्रवर्तक असलेल्या कपिल आणि धीरज या वाधवान बंधूंविरोधात ईडीने 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल न केल्यामुळे न्यायालयाने त्यांना हा जामीन मंजूर केला होता. एका गुन्ह्यात अटक झाल्यानंतर त्यात जामीन मिळताच त्यातनं आलेला ताण दूर करण्यासाठी लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी मे महिन्यात विशेष परवानगी काढत महाबळेश्वरला जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पुन्हा अटक होताच कोरोनाचं कारण पुढे करत त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र इतक्या गंभीर आर्थिक गुन्ह्याच्या प्रकरणात कोरोना हे जामीनाचं कारण असूच शकत नाही. मनी लाँड्रिंग हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्याचे भयानक परिणाम होऊ शकतात. यामुळे अर्थव्यवस्था खिळखिळी होऊ शकते, असे निरीक्षण नोंदवत हायकोर्टानं यापूर्वीही त्यांचा जामीन फेटाळला होता. प्रकृती ठीक नाही असे कारण देऊन चौकशी टाळता येणार नाही, असं न्यायालयानं त्यात स्पष्ट केलं होतं. कपिल आणि धीरज वाधवान हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.


काय आहे प्रकरण?


कुख्यात गँगस्टर इक्बाल मिर्चीची मालमत्ता खरेदी केल्याप्रकरणी ईडीने जानेवारीत कपिल वाधवानला अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग अॅक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच येस बँकेच्या 37 हजार कोटींच्या कर्ज मंजुरीच्या बदल्यात त्याने बँकेचा प्रमुख राणा कपूर आणि त्यांच्या कुटुंबियाच्या परदेशातील बँक खात्यावर 600 कोटींची लाच वाधवान यांनी दिल्याचे तपासातून स्पष्ट झाले. त्यानुसार त्यांच्याविरोधात सीबीआयनं 7 मार्च रोजी स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :