मुंबई : एखाद्या कथेच्या कल्पनेवर कुणाचा स्वामित्व हक्क असू शकत नाही, असं स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयानं `झोम्बिवली’ या मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या एका अन्य निर्मात्याला दिलासा देण्यास नकार दिला. तसेच या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही फेटाळून लावली.


तरूण वाधवा या एका चित्रपट निर्मात्यानं`झोम्बिवली’ या चित्रपटाच्या निर्मात्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याचा दावा करत सूट दाखल केला आहे. आपण मे 2018 मध्ये 'झोम्बी'शी संबंधित या चित्रपटाची कल्पना सारेगामाच्या युडल फिल्म्स या शाखेकडे सादर केली होती. त्यावर युडलने आपल्याला संपूर्ण पटकथा सादर करण्यास सांगितलं. आपण पटकथा पूर्ण केल्यानंतर आपल्याला यात आता काही स्वारस्य नसल्याचं सांगत त्यांनी त्यावेळी हा प्रस्ताव फेटाळून लावला. मात्र, त्यानंतर जुलै 2020 मध्ये सारेगामानं 'झोम्बिवली' या आगामी चित्रपटाची घोषणा केली. पण त्याची मूळ कथा आपलीच असल्याचा दावा वाधवा यांनी या याचिकेतून केला असून या चित्रपटाची कल्पना आणि त्या संबंधित सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला होता. त्यावर नुकतीच न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर सुनावणी पार पडली.


तेव्हा, सारेगामानं या चित्रपटासाठी आपली मूळ कल्पना वापरली असून हा गोपनीयतेचा भंग आहे. तसेच सारेगामानं कॉपीराईट कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोपही वाधवा यांच्याकडून करण्यात आला. त्याला सारेगामाकडून तीव्र विरोध करण्यात आला. तसेच आपण वाधवा किंवा इतर कोणाचाही कल्पना चोरलेली नसल्याचा दावाही सारेगामाकडून करण्यात आला.


हायकोर्टाचं निरिक्षण
दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर हायकोर्टानं स्पष्ट केलं की, गोपनीयतेचा भंग आणि स्वामित्व हक्काचे उल्लंघन यांचा जवळचा संबंध आहे. मात्र, अनेक प्रकरणात या दोन्ही गोष्टी घडलेल्या पहायला मिळतात. पण, सदर प्रकरणात मात्र स्वामित्व हक्काचं उल्लंघन झालेलं नसून इथं केवळ गोपनीयतेच्या कराराच्या भंगामध्ये याचा समावेश होऊ शकला असता. कारण, वाधवा यांच्या आरोपांनुसार त्यांनी एक कल्पना गोपनीयतेच्या करारांतर्गत सारेगामाला ऐकवली होती आणि सारेगामा ती वाधवा यांच्या परवानगीशिवाय वापरू शकत नव्हतं. पण, एखाद्या कल्पनेवर स्वामित्व हक्क सांगितला जाऊ शकत नाही. तसंच, वाधवा हे स्वामित्व हक्काचं उल्लंघन झालेल्या साहित्याखेरीज अन्य सामग्रीविषयी स्पष्ट माहिती सादर करण्यात अपयशी ठरल्याचं निरीक्षण नोंदवत न्यायालयानं त्यांची मागणी फेटाळून लावली.  


कसा आहे चित्रपट
`झोम्बिवली’ हा मराठीतील पहिला हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. मराठीत पहिल्यांदाच झोम्बीवर आधारित चित्रपट येत असून त्याचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे. या चित्रपटात अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात झळकेल अशी अपेक्षा आहे.