नवी मुंबई : संपादित जमिनीच्या मोबदल्यात साडेबारा टक्के योजनेतील भुखंड देण्यास सिडकोकडून चालढकल करण्यात येत असल्याने उरणच्या धुतूम गावातील एका शेतकऱ्याने सिडको कार्यालयात जाऊन तेथील अधिकाऱ्यांसमोर कीटकनाशक द्रव्य (विष) घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी घडली. दत्तु भिवा ठाकुर (वय 78) असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांना एमजीएम रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेतील शेतकरी दत्तु भिवा ठाकुर हे उरणच्या धुतूम गावातील असून सिडकोने त्यांची जमीन 1984 मध्ये संपादित केली आहे. त्यामुळे सिडकोकडून साडेबारा टक्के योजनेअंर्गत भुखंड मिळविण्यासाठी दत्तू ठाकुर हे गेल्या अनेक वर्षापासून सिडकोमध्ये हेलपाटे घालत आहे. सिडकोकडून साडेबारा टक्के योजनेतील भुखंड मिळत नसल्याने गत 18 ऑक्टोबर रोजी दत्तु ठाकुर हे सिडकोच्या कार्यालयात गेले होते, त्यावेळी त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्यांची जमीन नियाज खात्यात येत असल्याने व नियाज खात्यातील जमीनींना साडेबारा टक्के योजनेचा लाभ देण्यासंदर्भातील विषय शासनाकडे प्रलंबित असल्याचे सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. त्यावेळी दत्तु ठाकुर आपल्या घरी निघुन गेले होते.
मात्र, सोमवारी दत्तु ठाकुर हे पुन्हा सिडकोच्या कार्यालयात पहिल्या मजल्यावर गेले होते, यावेळी ते सिडकोतील पहिल्या मजल्यावरील अफ्पर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (भुसंपादन ) सतीश खडके यांच्या दालनात गेल्यानंतर त्यांनी सोबत आणलेले किटकनाशक सदृश्य द्रव्य प्राशन केले. हा प्रकार तेथील अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ दत्तु ठाकुर यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर एकच खळबळ उडाली. सध्या ठाकुर यांच्यावर एमजीएम हॉस्पीटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु असल्याची माहिती सीबीडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली. तर सिडकोने या घटनेची दखल घेतली असून त्यांच्या निवेदनावर कारवाई करणार आहोत. दत्तू भिवा ठाकूर यांच्याशी संबंधित विषय हा शासन दरबारी विचाराधीन असून त्याबाबतचा पाठपुरावा सिडकोतर्फे वेळोवेळी करण्यात येत असल्याचे सिडको कडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान रूग्णालयातील उपचाराचा खर्च सिडको उचलणार आहे.