मुंबई : "कोरोनाविरुद्धच्या लढाईत राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठाम उभं राहायला पाहिजे. ही देशाची लढाई आहे, असंही शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. तसंच "विरोधी पक्षाला वाटत असेल की असं राजकारण करुन सत्तेच्या पिंडाला कावळा शिवेल, पण आता लॉकडाऊनमध्ये कावळेही नाहीत. अशा अड्ड्यावर बसून जर कोण पत्ते पिसत असेल तर पिसावेत," अशी टीका करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसंच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत राज्यपालांसह विरोधकांवर भाष्य केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्याप मंजूर केलेली नाही. संजय राऊत यांनी या संदर्भात ट्वीट करुन राज्यपालांवर टीका केली होती. "राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है!," असं ट्वीट करत संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. यानंतर विरोधकही राज्यपालांच्या समर्थनार्थ ट्वीट करुन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत आहेत.
मुख्यमंत्र्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस, उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार
'राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी ठाम उभं राहावं'
संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राच्या राजभवनात राज्यपाल अधिकाऱ्यांना परस्पर बोलून यंत्रणा राबवतात. मुख्यमंत्र्यांचे आदेश वेगळे असू शकतात, राज्यपालांचे आदेश वेगळे असू शकतात. त्यामुळे ही कोरोनोसंदर्भात एक गोंधळ निर्माण होऊन विपरीत परिणाम होऊ शकतो. हे आम्ही नक्कीच बोलणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची मुदत 27 मे रोजी संपणार आहे. याबाबत अनेक बातम्या, समज, गैरसमज पसरत आहे. यामुळे प्रशासनामध्ये, जनतेमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. हे थांबवण्याचं काम राजभवनाचं आहे. या गोंधळाचा केंद्रबिंदू राजभवन आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल स्वत: मुख्यमंत्री होते. संघाचे कार्यकर्ते होते. त्यांना माहित आहे, अशा प्रसंगी कसं काम करायला हवं. त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ठाम उभं राहायला पाहिजे."
कायदेशीरदृष्ट्या ठाकरे सरकार चूक करणार नाही : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, "राजकीय फायद्या-तोट्याचं काम कोणी करु नये. राजकारण करु नका असं उद्धव ठाकरे कायम सांगत असतात. सर्वांनी एकत्र यावं ही लोकांचीही भावना आहे. तरीही असं राजकारण होत असेल तर ते राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात काम करत आहेत. अशा लोकांवर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे." तसंच कायदेशीरदृष्टया ठाकरे सरकार कोणतीही चूक करणार नाही. याआधी मुख्यमंत्री असे आमदार झाले आहेत याची अनेक उदाहरणं आहेत," असंही संजय राऊत म्हणाले.
राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, संजय राऊतांचा राज्यपालांवर निशाणा
...तर डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते : आशिष शेलार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील...दबाव कशाला आणताय? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना,मग आता लोकशाहीने वागा... असं आशिष शेलार म्हणाले.
विधानपरिषदेवर नियुक्तीसाठी उद्धव ठाकरेंच्या नावाची शिफारस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला अजून राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. 9 एप्रिल रोजी राज्य सरकारने घेतलेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र अजूनही राज्यपालांची प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते?
कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात याबाबत बोलताना 17 एप्रिल रोजी सांगितलं होतं की, "उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र राज्यपालांनी प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही. यामुळे घटनात्मक पेच राज्यात निर्माण होऊ शकतो. यापूर्वीही फेब्रुवारी महिन्यात दोन सदस्यांची नावं मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे पाठवली होती, मात्र त्याला देखील राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही. आता उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या प्रस्तावाही राज्यपालांकडे प्रलंबित आहे."
Maharashtra Politics | ...अशा अड्ड्यावर कितीही पत्ते पिसा, मुख्यमंत्री ठाकरेच : संजय राऊत