मुंबई : महाराष्ट्रातील आणि खासकरुन मुबंईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता मुंबईतील 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. एकाचवेळी 53 पत्रकारांना कोरोना झाल्याचं उघड झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या मीडिया कर्मचाऱ्यांमध्ये टीव्ही रिपोर्टर, कॅमेरामन, प्रिंट फोटोग्राफर यांचा समावेश आहे. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे अनेकांमध्ये कोरोनाची कोणतीच लक्षणे नव्हती.
गेल्या आठवड्यात पत्रकारांची संघटना टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनने मुंबईतील 167 जणांची कोरोनाची टेस्ट केली होती. या टेस्टचे रविवारी रिपोर्ट आले. यामध्ये 167 जणांपैकी 53 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. यामधील सर्वाधिक पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियामधील आहेत.
टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद जगदाळे यांनी याबाबत बोलताना सांगितलं की, एकूण 167 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 167 जणांपैकी 53 जणांचे रिपोर्ट्स कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. टीव्हीजेए आणि संबंधित संस्था मिळून या सर्व पत्रकारांना चांगले उपचार मिळतील याकडे आम्ही लक्ष देऊ. आता मुंबईतील इतर पत्रकारांच्याही कोरोना टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे कोरोनाबाधीत पत्रकारांचा आकडा वाढण्याची भीती विनोद जगदाळे यांनी व्यक्त केली. टीव्हीजेएने पत्रकारांसाठी गाईडलाईनही जारी केली आहे.
एकावेळी 53 पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली. मीडियाचं कोरोना विरुद्धच्या लढाईतील योगदान मोठं आहे. मात्र पत्रकारांनाच कोरोनाची लागण झाल्याचं ऐकूण चिंतीत झाले आहे. बुधवारी आणि गुरुवारी फिल्डवरील सर्व पत्रकारांची कोरोना टेस्ट केली जाणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
कोरोनाची लागण झालेले पत्रकार बातमीसाठी मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये फिरले आहेत. यापैकी काही पत्रकारांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्रकार परिषदा आणि विशेष मुलाखतीही घेतल्या आहेत. या दरम्यान काही पत्रकारांनी आपल्या कुटुंबियांसोबतही वेळ घालवला आहे, त्यामुळे आता कुटुंबियांची चिंताही त्यांना सतावत आहे.
- COVID-19 | प्रियांका चोप्रापासून लेडी गागापर्यंत जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी 'कोरोना वॉरियर्स'चे मानले आभार
- coronavirus | देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 16 हजारांवर, आतापर्यंत 519 जणांचा मृत्यू
- कोरोनाची माहिती लपवल्याप्रकरणी डॉक्टरसह तिघांवर गुन्हा दाखल, नाशिक महापालिकेची कारवाई