मुंबई : एखाद्या मुलीने मुलाशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले म्हणजे ती त्या मुलाला शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देईलच, असा त्याचा अर्थ होत नाही. किंबहुना त्या मुलाने तसं गृहितही धरु नये, असे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाने एका आरोपीला दिलासा देण्यास नकार दिला. लग्नाचं आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आशिष चकोर या आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नुकताच फेटाळून लावला. आजच्या समाजात जेव्हा स्त्री-पुरुष एकत्र काम करत असतात, तेव्हा त्यांच्यात जवळीक निर्माण होणं स्वाभाविक असते. ते एकतर मानसिकदृष्ट्या एकत्र जोडले जातात किंवा एकमेकांवर मित्र म्हणून विश्वास ठेवतात. मैत्री ही कधीही लिंगावर आधारित नसते, असंही हायकोर्टाने आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे.


काय आहे प्रकरण?
या प्रकरणात तक्रारदार पीडित तरुणी आणि आरोपी या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. साल 2019 मध्ये एका दिवशी आशिषने पीडितेला आपल्या मित्राच्या घरी नेऊन तिथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने यास नकार दिल्यावर त्याने तिला लग्नाचं वचन दिलं आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून ती गरोदर राहिल्यानंतर आशिष तिला टाळू लागला. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेने एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात धाव घेत आशिषविरोधात एफआयआर नोंदवला. 


यात अटक होऊ नये यासाठी आशिषने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. चांगली मैत्री म्हणजे एखाद्या पुरुषाला तिच्यावर जबरदस्ती करण्याचा परवाना देईल असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण आपल्या निकालात नमूद केलं. शिवाय शारीरिक संबंधांना तक्रारदार तरुणीने संमती देण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला होता की नाही हे तपासण्यासाठी आरोपीच्या चौकशीची आवश्यकता असल्याचं न्यायालयाने म्हटलं. आरोपी आशिष चकोर याला कोणताही दिलासा देण्यास नकार देत त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.