मुंबई : बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात आलेल्या तरुणाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. 'आरोपीने माझ्याशी विवाह केला असून आता आम्ही दोघेही आनंदाने संसार करत आहोत. शारीरिक संबंधांनंतर केवळ लग्नाला विरोध दर्शवल्यानेच आपण पोलिसांत तक्रार दाखल केली होती'. अशी स्पष्ट कबूली पीडित महिलेने हायकोर्टाच्या खंडपीठासमोर दिली. हा महत्वपूर्ण कबूलीजवाब ग्राह्य धरत न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने तरुणावरील एफआयआर रद्द केला आहे.


मागील वर्षी लग्नाचे आमिष दाखवून संबंधित तरुणाने बलात्कार केल्याचा पीडितेचा आरोप होता. त्यामुळे सदर महिलेने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी सदर तरुणाविरोधात भा.दं.वि. कलम 376 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तरुणाची त्याच्या घरच्यांनी समजूत काढली आणि त्यानंतर या दोघांनी 19 जानेवारी 2019 रोजी स्पेशल मॅरेज अॅक्टखाली विवाह केला. त्यानंतर तरुणाने आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. यात पीडित महिलेचे हित विचारात घेऊन हायकोर्टाने गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.