मुंबई : 'आमच्या आजोबांनी 80 वर्षांपूर्वी लावलेली झाडं तोडू नका, या झाडांसोबत आमच्या भावना जोडलेल्या आहेत', अशी भावनिक साद घालणाऱ्या दहिसरच्या पवार कुटुंबीयांना मुंबई उच्च न्यायालयानं तूर्तास दिलासा दिला आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी आपल्या विशेष अधिकारात दिलेल्या या परवानगीला हायकोर्टानं तूर्तास स्थगिती दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे यावर गुरुवारी सुनावणी झाली.


दहिसर पूर्व येथील मराठा कॉलनीत राहणाऱ्या चैतन्य पवार यांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पवार कुटुंबीय हे गेल्या 100 वर्षांपासून इथं स्थायिक आहेत. सध्या त्यांची चौथी पिढी इथं राहत आहे. चैतन्य यांच्या आजोबांनी आंबा, पिंपळ अशी काही झाडं आपल्या घराच्या आसपास लावली होती. यातील काही झाडं ही 80 वर्ष जुनी असली तरी आजही दिमाखात उभी आहेत.

या परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामानंतरही रस्त्यालगदची काही पूर्ण वाढ झालेली 13 डेरेदार झाडं तोडण्याची मुंबई महानगरपालिकेनं परवानगी दिली होती. मात्र गेल्या अनेक दशकांपासून ही डेरेदार झाडं इथं शीतल छाया देण्याचं काम करतात.

रस्तारुंदीचं काम पूर्ण झालं असल्यानं या झाडांचा वाहतुकीस तितकासा त्रास होणार नाही असा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. यासंदर्भात पालिकेचं वॉर्ड ऑफिस आणि पालिका आयुक्तांना वारंवार विनंती पत्र पाठवूनही काहीच उपयोग झाला नाही, तेव्हा अखेरीस पवार कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.