मुंबई : बेकायदा बॅनरविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना सत्तेचा माज दाखवत मारहाण करणाऱ्या भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस पाठवलीय. दादागिरी दाखवत महापालिकेच्या कारवाईत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तुमच्यावर अवमानाची कारवाई का करु नये? असे खडसावत हायकोर्टाने नगरसेवकासह कार्यकर्त्यांनी ही नोटीस बजावलीय. एवढेच नव्हे तर याप्रकरणी आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.


भाजपचे अंधेरीतील नगरसेवक मुरजी पटेल आणि केसरबेन मुरजी पटेल यांच्या जीवनज्योती फाऊंडेशनतर्फे पालिका मैदानाबाहेर व फुटपाथवर बेकायदा होर्डिंग आणि बॅनर लावल्याची तक्रार महापालिकेच्या वेबसाईटमार्फत मिळाली होती. त्यानुसार, खातरजमा केल्यानंतर के वॉर्डातील लायसन्स इन्स्पेक्टर उत्तम सरवदे हे आपल्या सहकाऱ्यांसह कारवाईस गेले.

महापालिका अधिकारी हे होर्डिंग्ज काढत असताना पटेल यांचे समर्थक आणि भाजपचे कार्यकर्ते राजू सरोज, सुनील चिले, रोशन शेख, नरेश शेलार, महेश शिंदे, प्रकाश मुसळे, विशाल निचिते यांनी त्यांना प्रचंड शिवीगाळ करत महापालिका कर्मचाऱ्यांना मारहाणही केली’, असे महापालिकेने अवमान याचिकेद्वारे हायकोर्टाच्या निदर्शनास आणले. तसेच यासंदर्भातील फोटोही पुराव्यादाखल सादर केले आहेत.

बेकायदा होर्डिंगमुळे राज्यातील अनेक शहरे विद्रुप झाली असून त्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुस्वराज्य फाऊंडेशनतर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असलेली सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली.