मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरता दिलासा दिला आहे. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात कोर्टाचे पुढील निर्देश येत नाहीत तोपर्यंत चार्जशीट दाखल करू नका असे निर्देश देण्यात आले आहेत.


24 लाखांचा गंडा घातल्याचा आरोप करत एका व्यापाऱ्यानं दाखल केलेल्या तक्रारीवरून भिवंडी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या मालकीच्या बिग डिल्स टेलिव्हिजन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत चालवल्या जाणाऱ्या टेलिशॉपिंग कंपनीनं 24 लाखांचं बिल थकवल्यानं, भिवंडीच्या मलोटिया टेक्सटाईल्स या कंपनीनं शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा यांच्यासह कंपनीच्या अन्य संचालकांविरोधात भिवंडी पोलिसांत तक्रार दिली होती. ज्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. वारंवार मागणी करूनही पुरवलेल्या बेडशिट्सचे पैसे न दिल्यानं ही तक्रार दाखल केल्याचं मालकाचं म्हणणं आहे.

मात्र सदर कंपनीसोबत बिग डिल्सचे वर्षभरापासून व्यवहार सुरु आहेत. याशिवाय या कंपनीचं 1 कोटी रूपयांचं बिल यापूर्वीच दिलेलं आहे. त्यामुळे 24 लाखांसाठी फसवणुकीचा कोणताही हेतू नाही. दोन्ही पक्षकारांमध्ये काही व्यावहारिक मतभेद आहेत, मात्र त्यासाठी अटकेची गरज नाही असा युक्तिवाद अॅड. अनिकेत निकम यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची बाजू मांडताना केला.