मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय. दोनदा मतदान करण्याच्या विधानासंदर्भातील याचिकेवर सुनावणीस हायकोर्टाने नकार दिला. इंडिया अगेंस्ट करप्शन संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पवारांविरोधात याचिका दाखल केली होती.

दाखल केलेली याचिका ही सुनावणी योग्य नसल्याने आम्ही ती फेटाळत आहोत. मात्र याचिकाकर्ते ही याचिका आम्ही फेटाळण्याआधी मागे घेऊ शकतात. अशी विचारणा न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभू-देसाई यांच्या खंडपीठाने करताच याचिकाकर्त्याच्या वकिलांनी आपली याचिका मागे घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माथाडी कामगारांच्या एका सभेत पवारांनी म्हटलं होतं की, निवडणुका दोन वेगळ्या तारखांना आहेत. तेव्हा एकदा गावी आणि नंतर कामाच्या ठिकाणी असं दोनदा मतदान करा. यावर शरद पवारांनी मतदारांची दिशाभूल केली, त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

दोन वर्षांपूर्वी हायकोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असल्याने त्यात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. तसेच संबंधित विभागाकडेच दाद मागण्याचे निर्देश दिले होते. मात्र निवडणूक आयोगाने योग्य दखल न घेतल्याने याचिकाकर्त्यांनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली. मात्र हायकोर्टाने यावर सुनावणी घेण्यास नकार दिला.