पालघर : आजच्या इंटरनेटच्या युगात अनेक कामं ऑनलाईन होऊ लागली आहेत. मात्र निधन झालेल्या आपल्या आईच्या अंत्यसंस्काराला येऊ न शकलेल्या मुलीने चक्क पार्थिवाचं अंत्यदर्शन व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंगने घेऊन, अस्थी कलश कुरियर करण्याची मागणी गावकऱ्यांकडे केली आहे.

मनोर इथील निरीबाई धीरज पटेल या 65 वर्षीय पारशी महिलेचं वृद्धापकाळाने निधन झालं. पती धीरज पटेल यांच वय झाल्याने त्यांना चालण्याचीही ताकद नाही. तर एकुलती एक मुलगी लग्न करुन गुजरातमधील अहमदाबादमध्ये असल्याने, त्यांचे अंत्यसंस्कार कोणत्या पद्धतीने करायचे असा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा राहिला.

ग्रामस्थांनी ही बाब मुलीला कॉल करुन सांगितली. पण मला यायला जमणार नाही, असं सांगत तिने व्हॉट्सअप व्हिडीओ कॉलिंगने आईच्या पार्थिवाचं दर्शन द्या आणि अस्थीही कुरिअर करा, अशी अजब मागणी केली. मुलीच्या या मागणीनंतर गावकऱ्यांनी तोंडात बोटं घातली.

पटेल दाम्पत्य पारशी असल्याने मनोरमध्ये पारशी पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यास सुविधा नाही. त्यामुळे गावातील हिंदू-मुस्लीम ग्रामस्थांनी एकत्र येऊन पारशी असलेल्या निरीबाई यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

सध्या सुरु असलेल्या धावपळीमुळे अनेक काम ऑनलाईन झाली आहेत. मात्र यामुळे संवेदनशीलता कमी झाली आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण होऊ लागला आहे.