मुंबई : मुंबईतील सर्वातमोठे प्रदर्शन केंद्र (एक्झिबिशन सेंटर) म्हणजेच 'नेस्को' विरोधात निरर्थक याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. याचिकाकर्त्यांची समाजहितासाठी असलेली प्रबळ इच्छा पाहता हायकोर्टानं त्यांना आठवडाभर मुंबईच्या समुद्र किनाऱ्याची साफसफाई करण्याची शिक्षा दिली आहे. त्यासाठी सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबवणारे सामाजिक कार्यकर्ते अॅड. अफरोज शहा यांची 2 सप्टेंबर रोजी भेट घेऊन त्याची माहिती कळवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

गोरेगाव येथील नेस्को कंपाऊंडच्या भूखंडाचा गैरवापर होत असल्याचा दावा करत राकेश चव्हाण यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

सुनावणीवेळी नेस्कोच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रसाद ढाकेफाळकर यांनी कोर्टाला सांगितले की, साल 1970 पूर्वी नेस्कोने ही जागा विकत घेतली आहे. तसेच कोणतेही बांधकाम होत असल्याची कुणकुण लागताच याचिका दाखल करण्याची याचिकाकर्त्यांना सवयच आहे. ही बाब लक्षात येताच मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याला खरोखरच जनसेवा करण्याची इच्छा असल्याने आठवडाभर मुंबईचा सागरी किनारा स्वच्छ करण्याची शिक्षा दिली आहे.