मुंबई : मुंबईतल्या अनधिकृत फेरीवाल्यांची मुजोरी वाढत असल्याचे वारंवार पहायला मिळत आहे. गुरुवारी घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास गेलेल्या पालिका अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांनी घेरले. या मुजोर फेरीवाल्यांनी अधिकारी व पोलिसांना घेरून त्यांना धमकावत धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे.

गेल्या वर्षी एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलावरील अपघातानंतर मुंबई महानगरपालिकेने रेल्वे स्थानक परिसराच्या दीडशे मीटरपर्यंतच्या परिसरातील फेरीवाल्यांना हटवण्यास सुरुवात केली. गुरुवारी घाटकोपर रेल्वेस्थानकालगत अनधिकृतपणे ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर पालिका अधिकारी व पोलीस कारवाई करण्यास गेले. परंतु यावेळी फेरीवाल्यांनी पालिका अधिकारी व पोलिसांनाच धक्काबुक्की करत धमकी दिली. याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांच्या तकारीवरून घाटकोपर पोलिसांनी सय्यद गौस वाहीद याच्यासह तीन फेरीवाल्यांवर गुन्हा नोंदवला आहे. सय्यद गौसला पोलिसांनी अटक केली असून 2 जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात मेट्रो रेल्वे स्थानक आल्यापासून फेरीवाल्यांची संख्या चौपटीने वाढली आहे. इथे फेरीवाला माफिया सक्रिय झाला आहे. येथील फेरीवाले पोलीस आणि पालिका प्रशासनालादेखील जुमानत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.