मुंबई : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे तरुणीवर बलात्कार करून करण्यात आलेल्या तिच्या हत्येवरून संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेली भूमिका ही स्त्रियांबद्दल मनुवादी मानसिकतेची अभिव्यक्ती आहे. तेव्हा मागासवर्गीय, दलित व आदिवासी यांच्यासोबत भारतीय स्त्रियांना धोका निर्माण झाला असून आता या विरोधात पुन्हा सामाजिक व राजकीय चळवळ सुरू केल्याशिवाय पर्याय नाही, असे मनोगत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितिन राऊत यांनी व्यक्त केले आहे.


केंद्रात भाजपचे सरकार असल्याने मनुवाद्यांचे मनोबल वाढले आहे. जणू काही धर्मनिरपेक्ष व लोकशाही भारत देश आता हिंदु राष्ट्र झाला आहे, असा आभास निर्माण करून लोकशाही व मानवतावादी मूल्यांना ते पायदळी तुडवत आहेत. तेव्हा देशातील तमाम समता प्रेमी व लोकशाही विचारांच्या लोकांनी मनुवादाच्या विरोधात सामाजिक चळवळ उभी करून प्रबोधन केले पाहिजे. तसेच या विचारांना खतपाणी घालणाऱ्या भाजप सरकारचा सत्तेचा माज उतरविला पाहिजे, असे निवेदन डॉ. राऊत यांनी केले आहे.


Hathras Gang Rape | राहुल गांधी यांना यूपी पोलिसांकडून अटक


केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर उत्तर प्रदेश ही मनुवाद्यांची जणू प्रयोगशाळाच बनली असून येथे दलित व मुस्लीम समाजासोबत महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण खूपच वाढले आहे. मॉब लिंचिंगचे व महिलांवर बलात्कारचे नव-नवे प्रयोग येथे करण्यात येत असून मोदी व योगी आदित्यनाथ यांचे मूक समर्थन मिळत असल्याने मनुवाद्यांचे मनोबाल वाढले आहे. या हीन मनुवादी मानसिकतेच्या विरोधात आपण सगळ्यांनी जंग छेडली पाहिजे, नाहीतर येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही, असा इशाराही डॉ. राऊत यांनी दिला आहे.


UP Hathras gangrape case | राहुल, प्रियंका गांधींचा ताफा यमुना एक्स्प्रेस वेवर पोलिसांनी रोखला