मुंबई : जवळपास तीन तासांच्या खोळंब्यानंतर हार्बर मार्गावरील लोकल रेल्वेची वाहतूक सुरु झाली आहे. शिवडी स्थानकाजवळ तुटलेलं ओव्हरहेड वायर दुरुस्त करण्यात आल्यानंतर वडाळा ते सीएसएमटी लोकल सेवा सुरु करण्यात आली. मात्र लोकल सध्या उशिराने धावत आहेत.

लवकरच लोकल सेवा पूर्वपदावर आणण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.


हार्बर मार्गावरील शिवडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील सर्व लोकल जागच्या जागी उभ्या होत्या. लोकल सेवा खोळंब्याने सकाळच्या सुमारास ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी अडचण झाली. हार्बर मार्गावरील सर्वच स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.


हार्बर मार्गावरील प्रवाशांना कुर्ला स्थानकातून पुढील प्रवासासाठी मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच वडाळा ते सीएसएमटी दरम्यानच्या प्रवाशांसाठी बेस्टच्या जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ओव्हर हेड वायरच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झालं आहे. पण लोकल सेवा उशिराने सुरु आहे. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या चाकरमान्यांचे मोठे हाल होत आहेत.