मुंबई : भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबईत हल्लाबोल आंदोलन केलं. आझाद मैदानावर शरद पवार यांनी सभेला उद्देशून भाषण केले.


"महागाई वाढली आहे, संसार चालवणं कठीण झालं आहे. कारखाने बंद होऊन नवीन रोजगार मिळत नाही. कामगार वर्गावर अन्याय होत आहे. हे दूर करण्याची जबाबदारी ज्यांची होती ते असफल ठरलेत. आज लोक म्हणायला लागले आहेत की, आम्हाला अच्छे दिन नको, आमचे पूर्वीचे दिवस परत द्या." असे म्हणत पवारांनी सरकारवर निशाणा साधला.

पवार पुढे म्हणाले, "शासकीय आश्रमशाळांत मूलभूत गरजांसाठी दरमहा ९०० रुपये फी आकारणे सुरू झाले आहे. आदिवासी, गरीब, विमुक्त जाती-जमाती अशी मागासवर्गीय मुले आश्रमशाळांत शिकतात. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा हा निर्णय घेणाऱ्या सरकारला नादान म्हणावे लागेल."

"राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोलच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांत जाऊन सामान्यांचे दुःख दूर करण्यासाठी त्यांच्या पाठीशी पक्ष उभा आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र व कोकणच्या जिल्ह्यांतही हल्लाबोल यात्रा पोहोचेल.", असा विश्वास पवारांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, भाजपने मुंबईत 'गरीब रथ' काढला होता, त्याला उत्तर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत 'बकासुर रथ' काढणार असल्याची माहिती मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी दिली.