नवी मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी आणि हापूस आंब्याचे पूजन करण्याची परंपरा आहे. मात्र यंदा आंब्याची आवक ५० टक्क्यांनी घटल्याने सोन्याच्या दरात आंबा विकत घेण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.


अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कोकणातील हापूस आणि कर्नाटकमधील आंब्याच्या मिळून दरवर्षी सव्वा लाख पेट्यांची आवक होते. मात्र यंदा नेमकी उलट परिस्थिती आहे. आंब्याचे उत्पादन घटल्याने आवक ५० टक्यावर आली आहे. यामुळे आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत.

अक्षय्य तृतीयेला नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये १५० ते ५०० रुपयांपर्यत मिळणारा आंबा यावर्षी ४०० ते ९०० रुपये घाऊक बाजारात विकला जात आहे. तर किरकोळ बाजारात तो ८०० च्या घरात डझनाचा भाव आहे.

अक्षय्य तृतीयेनंतर हापूसच्या किंमतीत घट होत असल्याचं गेल्या अनेक वर्षापासून पाहायला मिळत आहे. दरवर्षी सव्वा लाख पेट्यांच्या पुढे हापूस आंब्याची आवक होते. यामध्ये कोकण आणि कर्नाटक आंब्याचा समावेश आहे. १ लाख कोकणातील तर २५ हजार कर्नाटक हापूसचा समावेश असतो. पण य यावर्षी आवक ५० टक्क्याने घटली आहे. यंदा ६० ते ६५ हजार पेट्यांची आवक झाली असल्याने आंब्याचे दर वाढले आहेत.