कल्याण : धावत्या लोकलमधून नाल्यात पडलेल्या तरुणाला वाचवण्याऐवजी बघ्यांनी त्याचं चित्रीकरण करण्यात धन्यता मानली आणि या तरुणाचा सर्वांदेखत बुडून मृत्यू झाला. कल्याणमध्ये घडलेल्या घटनेमुळे नागरिकांमध्ये माणुसकी उरली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
सोमवार सकाळी 11.30 ची वेळ... कल्याणच्या शहाड भागात एका नाल्याशेजारी स्थानिकांची अचानक गर्दी झाली. काय झालं हे पाहण्यासाठी अनेक जण आपापल्या गाड्या थांबवून नाल्याशेजारी धावले. यावेळी नाल्यात एक युवक बुडत असल्याचं लोकांना दिसलं.
या लोकांपैकी कुणीही पुढे येऊन या युवकाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, उलट आपापल्या मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यात धन्यता मानली.
एक तरुण नाल्यात उतरला, पण तोवर खूप उशीर झाला होता. या तरुणाचा सर्वांदेखत बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं.
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ पुढे आला, आणि असंवेदनशीलतेनं किती कळस गाठला आहे, हे समोर आलं. सर्वांदेखत हा युवक बुडत असताना एकाने तरी त्याला वाचवायला पुढे यायला हवं होतं, पण तसं झालं नाही.
कल्याणसारख्या शहरात घडलेल्या या प्रकाराबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या फॅडमुळे माणसा-माणसातला संवाद तर कमी झाला आहेच, पण आता संवेदनशीलताही संपू लागल्याचं या धक्कादायक प्रकारानं समोर आलं.
लोकलमधून पडलेल्या या युवकाचं वय अवघं वीस वर्षांचं असून तो क्लास किंवा कॉलेजहून परतत असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय तो लोकलमधून नाल्यात पडला, त्यावेळी त्याच्यासोबत आणखी एक तरुणही होता, मात्र तो किरकोळ जखमी झाल्यानं उठून पळून गेल्याचं सांगितलं जातं.
या दोघांचा तोल जाऊन ते पडले, की गाडीत टीसी आला आणि त्याला घाबरुन दोघांनी उडी मारली? हे कळायला मार्ग नाही. कारण मृत तरुणाची अजूनही ओळख पटलेली नाहीये. त्याची ओळख पटल्यानंतरच या सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकणार आहे.
या सगळ्या घटनेनंतर खरोखर माणुसकी हरवत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित झालाय. कारण एखाद्या जखमीला वाचवण्याऐवजी सोशल मीडियाच्या नादापायी त्याचे फोटो काढणं, हा माणुसकीचा धर्म नक्कीच नाही. एखाद्याचा जीव गेल्यानंतर तरी लोकांना शहाणपण येईल का, हा प्रश्नच आहे.
लोकलमधून नाल्यात पडला, 'असंवेदनशीलतेत' बुडून तरुणाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Apr 2018 04:22 PM (IST)
लोकांपैकी कुणीही पुढे येऊन या युवकाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, उलट आपापल्या मोबाईलमध्ये त्याचं चित्रीकरण करण्यात धन्यता मानली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -