मुंबई: राज्यासह देशभरात आज श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह आहे. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मसोहळा पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

आज दिवसभरतात मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. ठाण्यात मध्यरात्री मोठ्या उत्साहात कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी महिला भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  पारंपारिकरित्या हा उत्सव साजरा करण्यात आला. बरोबर बारा वाजता कृष्णाचा पाळणा जोजवण्यात आला.

14 वर्षाखालील गोविंदांवर बंदी

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार 14 वर्षांखालील गोविंदांना सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. गेल्या वर्षी बालगोविंदांना सहभागी करणाऱ्या मंडळांवर कारवाई होत होती. यंदा मात्र पालकांवरही कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. फक्त मुंबईतच नाही, तर ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यासह मुख्य शहरांमध्ये पोलिसांनी असा इशारा दिल्याचं कळतंय.

बिग बॉसचे स्पर्धक दहीहंडीत

इकडे स्वामी प्रतिष्ठानची दहीहंडी अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हस्ते फोडण्यात आली. याशिवाय अभिनेता सुशांत शेलार, अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत यांसारखे अनेक मराठी कलाकार उपस्थित होते.

ठाण्यात स्वामी प्रतिष्ठानतर्फे सर्वात मोठी म्हणजेच 25 लाखांची दहीहंडी लावण्यात आली आहे. ठाण्यातील हिरानंदानी मेडोज चौक, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहासमोर स्वामी प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.



प्रो दहीहंडी

प्रो-कबड्डी स्पर्धेप्रमाणे यंदा प्रो दहीहंडी स्पर्धा भरणार आहे. आमदार प्रताप सरनाईकांच्या संस्कृती प्रतिष्ठानतर्फे पहिल्या वहिल्या “प्रो दहिहंडी” स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत ठाण्यातील पाच आणि मुंबईतील दहा गोविंद पथकं ज्यांचा 8 ते 9 थरांचा विक्रम आहे असे गोविंदा पथक यामध्ये सहभागी असतील. दहीहंडी समन्वय समितीने या 15 संघाची निवड केली आहे. कमीत कमी वेळेत थर रचणाऱ्या पथकाला यात बक्षिस मिळेल.

‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी धरला ठेका!

भिवंडीत पुस्तक दहीहंडी

भिवंडीमध्ये पुस्तक दहीहंडी साजरी करण्यात आली... अनेक  शाळांमधून असंख्य  विद्यार्थ्यांनी सहभाग घेत ही दहीहंडी फोडण्याचा आनंद घेतला..प्रथम क्रमांक पटकाविलेल्या शाळेला  सुमारे ४०० विविध पुस्तके भेट देण्यात आले...परिवर्तन फाऊंडेशन व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष साळवी यांच्या संकल्पनेतून पुस्तक दहीहंडी सोहळा करण्यात आला.

येवल्यात अनोखी वेशभूषा स्पर्धा

गोकुळाष्टमीनिमित्त येवल्यामध्ये बाळगोपाळांची अनोखी वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या धडपड मंचतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या स्पर्धेत 130 बाळगोपाळांनी भाग घेतला. नटखट, गंभीर, खेळकर, बासरीवाला, दहिहंडीतील लोणी खाणाऱा माखणचोर अशी श्रीकृष्णाची अनेक रुपं बाळगोपाळांनी वेशभूषेच्या माध्यमातून साकारली. विशेष म्हणजे 2 महिन्याच्या बालकापासून 3 वर्षांच्या मुलांनी यात सहभाग घेतला. शेवटी या बाळगोपाळांना बक्षीसांचं वितरणही करण्यात आलं.

शिर्डीत उत्साह

शिर्डीतही श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतेय. काल रात्री साईंच्या मंदिरात चांदिच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मूर्ती ठेवून पाळणा हलवण्यात आला. यावेळी देशभरातून आलेल्या भाविकांनी हजेरी लावली होती. जन्माष्टमीनिमित्त लाखो भाविक आज शिर्डीत दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळं मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिसांचाही मोठा फौजफाटा शिर्डीत तैनात आहे.

पंढरपुरात जन्माष्टमी

पंढरपूरात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विठुरायाची रावुळी आकर्षक देशी विदेशी फुलांनी सजविण्यात आली आहे. मध्यरात्री बारा वाजता विठ्ठल मंदिरात जन्माष्टमीच्या सोहळा साजरा करण्यात आला. पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी ही सजावटीची सेवा दिली असून, विविध प्रकारच्या हजारो देशी विदेशी फुलांनी ही सजावट केली आहे..

जन्माष्टमीपूर्वी चोरी

ठाण्यातील मुख्य बाजारपेठेतील गोवर्धन वैष्णव कृष्ण मंदिरातील चोरीप्रकरणी 3 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. कृष्ण जन्माष्टमीपूर्वी मंदिरात दागिने आणि पैशांची चोरी झालीय. हे मंदिर गुजराती गोवर्धन वैष्णव समाजाचं आहे. रोकड, दानपेटीतली काही रक्कम आणि दागिने मिळून 40 लाखांचा माल चोरी झालाय, पोलिसांनी हा सर्व माल चोरट्यांकडून जप्त केलाय.

संबंधित बातम्या 

दहीहंडीला वर्गणी न दिल्याचा राग, पुण्यात दुचाकी जाळली!  

‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी धरला ठेका!