मुंबई : शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी स्वपक्षाच्या मंत्र्यांनाच घरचा आहेर दिला आहे. शिव वाहतूक सेनेच्या मेळाव्याच्या व्यासपीठावरुन परिवहन मंत्री दिवाकर रावतेंवर शेख यांनी तुफान टीका केली.


विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर हेही उपस्थित होते.

परिवहन मंत्र्यानी गेल्या तीन वर्षांत रिक्षा चालकांसाठी एक स्टॅण्ड तरी बांधला का?, असा थेट निशाणा हाजी अराफत शेख यांनी दिवाकर रावतेंवर केला.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘सामना’तील आदेशानुसार पक्षातील सर्व वाहतूक संघटनांचे नेतृत्व माझ्याकडे देण्यात आले आहे. मात्र, पक्षात उद्धव ठाकरे यांचे आदेश मानले जातात का? माझ्याच कार्यकर्त्यांना पक्षातले लोक मारहाण करतात. परिवहन मंत्री दिवाकर रावते माझा जातिवाचक उल्लेख करतात आणि माझ्या समर्थकांना भेटणं टाळतात.”, असे गंभीर आरोपही हाजी अराफत शेख यांनी केले.

मी शिवसेनेतच राहीन. पण संघटनेत जर माझं ऐकलं जाणार नसेल, तर शिव वाहतूक संघटनेचं अध्यक्षपद यापुढे माझ्याकडे नको, असेही हाजी अराफत शेख यांनी स्पष्ट केले.

यावेळी हाजी अराफत शेख यांच्या स्फोटक भाषणानंतर शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला. शिवाय, उद्धव ठाकरे यांच्यापुढे बाजू मांडण्याचं खोतकर यांनी शेख यांना आश्वासनही दिलं.

दरम्यान, येत्या 19 तारखेला उद्धव ठाकरेंसोबत हाजी अराफत शेख यांची चर्चा होणार आहे. यातून काय पुढे येतं, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.