Guillain Barre Syndrome In Mumbai मुंबई: मुंबईतील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) बाधित 53 वर्षीय रुग्णाचा मुंबईत मृत्यू झाला आहे. पायांमध्ये अशक्तपणा आल्‍यामुळे बाई यमुनाबाई लक्ष्‍मण नायर रूग्‍णालयात दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी दाखल झालेल्‍या एफ उत्‍तर विभागातील 53 वर्षीय पुरूष रूग्‍णावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू होते. श्वसनास त्रास होत असल्‍याने या रूग्‍णाला कृत्रिम जीवनप्रणाली (व्हेंटिलेटर) वर ठेवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) ची बाधा झाल्याचे निदान झाले. त्‍यानुसार, रूग्‍णावर योग्य ते उपचार करण्‍यात आले. उपचार सुरू असतानाच सोमवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी या रूग्‍णाचे निधन झाले आहे. या रुग्णाला या पूर्वी ताप किंवा अतिसार (Diarrhea) ची लक्षणे नव्हती. केवळ रक्तदाबाची समस्‍या होती. यमुनाबाई लक्ष्‍मण नायर रूग्‍णालयात दाखल होण्याच्या 16 दिवसांपूर्वी हा रूग्‍ण पुणे येथे जाऊन परतला होता, असे निष्‍पन्‍न झाले आहे. 


या व्यतिरिक्त सद्यस्थितीत पालघर येथील 16 वर्षीय मुलगी गुइलेन-बॅरे सिंड्रोम बाधेमुळे बाई यमुनाबाई लक्ष्‍मण नायर रूग्‍णालयात दाखल आहे. या रुग्ण मुलीला ताप आला होता. योग्य उपचारांमुळे रूग्‍ण मुलीच्‍या प्रकृतीत सुधारणा होत आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) उपचारांसाठी मुंबईतील सर्व महानगरपालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुसज्ज आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्‍याचे महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने स्‍पष्‍ट करण्‍यात येत आहे. नागरिकांनी गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास घाबरुन जाऊ नये. मार्गदर्शन व उपचाराकरिता जवळच्या महानगरपालिका रुग्णालयास त्वरित संपर्क करावा, असे आवाहनदेखील महानगरपालिका प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.  


गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?


गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ स्वयंप्रतिकार (Auto immune) स्वरुपाचा विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्याच चेतासंस्‍थांवर  (peripheralnervous system) हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होतात आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा संसर्गजन्यरोग नाही. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. याचे निश्चित कारण अज्ञात आहे. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे. गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग नवीन नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर तो विकसित होऊ शकतो. तसेच GBS ची इतर अनेक कारणे असतात. गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा रोग वर्षभर आढळतो. साधारणपणे 1 लाख लोकांमध्ये एकजण या रोगाने ग्रस्त असतो. त्यामुळे, मुंबईतील मोठी रूग्‍णालये / वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर महिन्याला 'जीबीएस' चे काही रुग्ण उपचारासाठी येतात.


गुइलेन-बॅरे सिंड्रोमची लक्षणे-


- अचानक पायातील किंवा हातात येणारा अशक्तपणा / दुर्बलता / लकवा
- अचानकपणे उद्भवलेला चालण्‍यातील त्रास किंवा अशक्तपणा
- जास्‍त दिवसांचा अतिसार (डायरिया) आणि ताप


नागरिकांनी घ्यावयाची काळजी-


- पिण्याचे पाणी उकळून प्‍यावे
- स्वच्छ व ताजे अन्न खावे
- शिजलेले अन्न आणि न शिजलेले कच्चे अन्न एकत्रित ठेऊ नये 
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा
- हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधावा.


संबंधित बातमी:


Guillain Barre Syndrome: राज्यातील जीबीएस सिंड्रोमची रुग्णसंख्या 197 वर, 20 ते 29 वयोगटातील तरुणांना जास्त धोका