मुंबई : मुंबई महानगरपालिकेने चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी स्वतंत्र नियमावली जाहीर केली आहे. यात मॉल्स, मार्केट बंदच राहणार असून अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. महत्वाचं म्हणजे मुंबईत सरसकट दारु विक्रीला परवानगी दिलेली नाही. केवळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुनच दारु विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर, कंटेनमेंट झोन असलेल्या भागात कोणत्याही दुकांना उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.


मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. आजच्या एका दिवसात मुंबईत 1751 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 27 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. या सर्व पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने शहरात चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनसाठी गाईडलाईन्स जारी केल्या.


काय आहे नियमावली?




  • मुंबईत सरसकट दारु विक्रीला परवानगी नाही.

  • मुंबईत केवळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरुनच दारु विक्री होईल.

  • कोणत्याही परिस्थितीत काऊंटरवर दारु विक्री होणार नाही म्हणजेच दारुची दुकाने उघडणार नाहीत.

  • कंटेनमेंट झोन वगळूनच दारु विक्री-खरेदी होईल.

  • सीलबंद बाटलीत व घरपोच दारु पोहोचवली जाईल.

  • परवाना असलेल्यांनाच दारु विक्री-खरेदी करता येईल.

  • कोणत्याही प्रकारे माल्स, मार्केट, बाजारपेठ बंद राहणार.

  • केवळ अत्यावश्यक दुकान उघडण्यास परवानगी. एकल दुकान सुरू होणार. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये दुकानं बंद राहणार.

  • एक रस्त्यावर पाच दुकान सुरू राहण्यास परवानगी.


मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय


मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा धोका वाढताना दिसत आहे. आजच्या दिवसभरात सर्वाधिक 1751 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. परिणामी मुंबईत आतापर्यंत 27 हजार 251 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पैकी 909 जणांना आपला जीव गमवाव लागला. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शहरात रुग्णालये कमी पडू लागली आहेत. परिणाणी शहरातील विविध भागात तात्पुरत्या स्वरुपाची क्वॉरंटाईन सेंटर आणि रुग्णांलये उभारण्यात येत आहे.


मुंबईकरांनो सावधान कोरोना सोबतच डेंग्यू, मलेरियाचंही संकट!


पावसाळ्याच्या तोंडावर साथीच्या आजाराचे संकट

कोरोनाचं वाढतं संकट कमी होतं की काय म्हणून आता मुंबईकरांसमोर आणखी एक संकट आ वासून उभं राहिलं आहे. केवळ नऊ दिवसांच्या तपासणी मोहिमेदरम्यान शहरात एक हजार 146 ठिकाणी डेंग्यू; तर 333 ठिकाणी मलेरिया वाहक डासांच्या अळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या कीटकनाशक खात्यानं मुंबईच्या कानाकोपऱ्यात सर्वेक्षण सुरु केलं आहे. आपल्या घरात किंवा आजूबाजूच्या परिसरात कुठेही उघड्यावर साचलेलं पाणी असणार नाही. याची आत्यंतिक काळजी घेण्याचं आवाहन महापालिकेच्या कीटक नाशक खात्याने मुंबईकरांना केलं आहे.


Mumbai Malls | मॉल्समध्ये सोशल डिस्टन्सिंग कशा पद्धतीने पाळलं जाणार? ग्राहकांच्या सुरक्षेसाठी काय बदल?