मुंबई: आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह देशभरात विविध ठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुंबईसह राज्यभरात मोठ्या आनंदात, उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचं स्वागत केलं जातंय.

यंदा मुंबईतल्या दादरच्या महापौर बंगल्यावर शेवटची गुढी उभारण्यात आली. महापौर बंगल्याची जागा आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी हस्तांतरीत करण्यात आली आहे.

त्यामुळे वर्षानुवर्ष महापौर बंगल्यावर उभारल्या जाणाऱ्या गुढीच्या परंपरेतील हा शेवटचा गुढीपाडवा ठरणार आहे. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि पत्नी पुजा महाडेश्वर यांनी महापौर बंगल्यात गुढी उभारली.

शिवसेनेनं विजयाची गुढी उभारली आहेच आता विकासाची गुढी उभारतोय. उद्या पालिकेच्या अर्थसंकल्पात या विकासाच्या गुढीचे प्रतिबींब दिसेल, असं यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले.

दुसरीकडे महापौरांच्या हक्काच्या घरात गुढीपाडवा कधी होणार असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला, त्यावर महापौर निवास म्हणून कोणतेही घर मिळाले तर ते हक्काचेच असेल, असं उत्तर महाडेश्वरांच्या पत्नीने दिलं.