मुंबई : गेल्या काही दिवासांपूर्वी संसदेत शत्रू संपत्ती बिल पारित झाल्यापासून, मुंबईतील जिना हाऊस ताब्यात घावे, अशी मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर आज जिना हाऊसबाहेर मंगलप्रभात लोढा व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुढी उभारुन जिना हाऊसचा प्रतिकात्मक ताबा घेतला.


गेल्या काही दिवसांपूर्वी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी शत्रू संपत्ती विधेयक पारित केलं. त्यानंतर देशातील शत्रू राष्ट्रांच्या संपत्ती ताब्यात घेण्यात येणार होत्या. यामध्ये भारत-पाकिस्तानची फाळणी घडवून आणणाऱ्या महमंद आली जिना यांचं मुंबईतील जिना हाऊस याचाही समावेश आहे. मात्र, यावर जिनांचे वारसदार वाडिया यांनी हक्क सांगितला होता.

या पार्श्वभूमीवर मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आक्रमक भूमिका घेऊन, आज जिना हाऊसच्या गेटवर गुढी उभारुन हाऊसचा प्रतिकात्मक ताबा घेतला.

याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार मंगलप्रभात लोढा म्हणाले की, ''जिना हाऊस संदर्भात मी गेल्या 15 वर्षांपासून संघर्ष करत आहेत. जिना हाऊसची वास्तू राज्य सरकारने ताब्यात घेऊन, तिथे एखादे सांस्कृतिक संग्रहालय उभारण्यात यावे, अशी मागणी मी वेळोवेळी विधानसभेत केली आहे. त्यात आता केंद्र सरकारने शत्रू संपत्ती विधेयक मंजुर केल्याने, या वास्तूवर वाडियांचा अधिकार नाही. त्यामुळे इथे आता महाराष्ट्राची संस्कृतिची माहिती सांगणारे भव्य संग्रहालय उभारावे. यासाठीच आपण आज जिना हाऊसबाहेर गुढी उभारुन प्रतिकात्मक ताबा घेत आहोत.''

संबंधित बातम्या : मुंबईतील 'जिना हाऊस' तोडा आणि सांस्कृतिक केंद्र उभारा : लोढा