कोरोनानं मोठ मोठ्या महासत्तेला ही जमिनीवर आणलं आहे. मात्र याच कोरोनानं ज्यांचं हातावर पोटं आहे. त्यांना तर हा आजार होवून मरणं पत्करलेलं बरं, असं म्हणण्याची वेळ आणलीय. या लॉकडाऊनमुळं सगळं थाबलं आहे. मात्र पोटाची भूक काही केल्या थांबत नाही. श्रमिक कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
वसईच्या कोल्ही-चिंचोटी परिसरातील मुंबई अहमदाबाद महामार्गाला लागून असलेल्या खुताडी पाडा या चाळीतील एका रिक्षाचालकाची ही अवस्था देशातील बहुतेक श्रमिक कामगारांची आहे. बिनोद सोनी हे स्वतः भाड्याने रिक्षा चालवतात. त्यांची दोन्ही मुलं बिगारी काम करतात. घरातील मोठा मुलगा राहुल सोनी याचं लग्न झालंय. त्याला तीन महिन्याचा मुलगा आहे. लॉकडाऊन नसताना घरातील हे तिघेही पुरुष दिवसाला कमवून घरं चालवायचे. आता मात्र या लॉकडाउनमुळं घरातील कमवते पुरुष मंडळी घरी बसली आहेत.
कोरोना तपासणीनंतर मजुरांना गावी जाता येईल का?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
पैशांअभावी या कुटुंबाची उपासमार होते. कधीतरी कुणी सामाजिक संस्था धान्य देते तेवढ्यावर एवढ्या मोठ्या कुटुंबाला एक वेळचं जेवणं बनवून खावं लागतं. सध्या ते एकवेळीच जेवण बनवतात. काय करावं हेच सुचतं नाही. घऱातील अन्नधान्य साठवणीचे डब्बे पार रिकामे झालेत, असं सोनी यांनी सांगितलं.
घरात पती-पत्नी, दोन मुलं, दोन मुली, सून आणि तान्हुला मुलगा असा संसार. जेवण नसल्याने दोन मुलींना नातेवाईकांकडे ठेवलं आहे. एबीपी माझा ज्यावेळी इथं पोहोचला त्यावेळी दिवसभर रस्त्यावर टक लावून हे कुटुंब बघत होतं. कुणीतरी येईल आणि काहीतरी अन्नाची मदत करेल, अशा आस त्यांच्या डोळ्यात दिसत होती. घरातील रिकामे डब्बे बघून कुटुंबातील कर्त्या पुरुषाला आपल्या डोळ्यातील अश्रूच आवरता आले नाहीत. असं उपाशी मरण्यापेक्षा आजाराने मेलेलं बरं, असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
आम्ही त्यांच्या वेदना जाणून घेतल्या. बातमी ही केली मात्र त्यांना उपाशी कसं झोपवायचं म्हणून ओळखीच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांना आमच्या प्रतिनीधींनी संपर्क केला. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत देशमुख रात्रीच्या अंधारात दूध आणि अन्नधान्य घेवून पोहचले. सामाजिक भावनेतून आम्ही अन्नधान्य, खिचडी वाटप करत असतो, मात्र एबीपी माझामुळे एक कुटुंब आज उपाशी झोपलं नाही, याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. असं देशमुख म्हणाले. तसेच आता सोनी आणि सोनी यांच्यासारख्या येथील कुटुंबाच्या खाण्यापिण्याची जबाबदारी ही आम्ही उचलतो अशी ग्वाही देखील त्यांनी एबीपी माझाला दिली.