मुंबई : राज्यात पार पडलेल्या विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतपत्रिकेवरून गंभीर आरोप केले आहेत. 'मराठवाडा आणि पुण्यात मतदानादरम्यान मत पत्रिका या कोऱ्या होत्या, असा आरोप पाटील यांनी केला. याबद्दल पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. या सगळ्या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
भाजपची दोन दिवस चिंतन बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका मांडली. दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यासाठी 28 कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आली असून हे सर्व 28 कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 28 कार्यकर्ते आगामी तीन दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये प्रवासाला निघाले आहेत. काही जणांकडे दोन जिल्ह्यांची जबाबदारी आहे. हे कार्यकर्ते ग्रामपंचात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय स्थिती आहे. किती ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते उभे आहेत. त्यातील किती गावं ही भाजपच्या सरपंच करण्याच्या दिशेने जातील, अशी सर्व योजना आखतील, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी तयारी सुरु : चंद्रकांत पाटील
ज्या सहा विधानपरिषद निवडणुका झाल्या त्याची या बैठकांमध्ये समीक्षा झाली असून ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजना झाली. 14 हजार 500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये अतिशय चांगलं यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बुथ स्तरापर्यंत काम कसं वाढेल, पाच महानगर पालिका व 92 नगरपंचायतींच्या निवडणुका साधारण मार्च अखेर किंवा एप्रिल मध्यात होणार आहेत, यासंदर्भात देखील योजना या बैठकीत आखण्यात आली आहे.” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
Maharashtra Gram Panchayat Election | ग्रामपंचायत निवडणुकीवर चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद