मुंबई : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या आदेशानंतर मुंबईतील एका कॉलेजच्या कँटिनमधील रोप पार्टिशन हटवण्यात आलं आहे. वांद्रे परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन अर्थातच गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या कँटिनमधील रोप पार्टिशन टाकण्यात आलं होतं.

कँटिनमध्ये मुलं आणि मुलींच्या बसण्याची वेगळी सोय करत पार्टिशन टाकण्यात आलं होतं. अखेर विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे आणि शिक्षणमंत्र्यांच्या आदेशानंतर हे पार्टिशन काढून टाकण्यात आलं आहे.

काही मुलं मुलींची छेड काढत असल्याची तक्रार आल्यानंतर कँटिनमध्ये पार्टीशन टाकल्याचं पॉलिटेक्निकच्या प्राचार्या स्वाती देशपांडे यांनी सांगितलं. तसंच युनिफॉर्मची सक्तीही केली होती. मात्र हा सर्व प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी मध्यस्थी करत कॉलेज प्रशासनाला पार्टिशन हटवण्याचे आदेश दिले. तसंच मुलींवर कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेची सक्ती केली जाऊ नये, असे निर्देशही दिले आहेत.

आता शिक्षणमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर या पॉलिटेक्निकमध्ये मुला-मुलींना एकत्र बसण्याची मुभा देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील वांद्रे परिसरात गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे. काही दिवसांपूर्वी विनयभंगाची तक्रार आल्याचं कारण देत प्राचार्या स्वाती देशपांडेंनी कॉलेज कँटिनमध्ये पार्टिशन टाकलं. तसंच मुलींना शर्ट-ट्राऊझरऐवजी कुर्ता पायजमा वापरण्याच्या सूचना दिल्या.

प्राचार्या देशपांडेंनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच मुलींना कँटिनमध्ये बसण्यास जागा कमी पडत असल्यानं पार्टिशन काढल्याचंही सांगितलं.

मात्र या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर आवाज उठवला. अखेर शिक्षणमंत्री विनोद तावडेंनीही याची दखल घेत कॉलेज प्रशासनाला पार्टिशन काढून टाकण्याचं आणि कुर्ता पायजम्याची सक्ती न करण्याचे निर्देश दिले आहेत.