मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेबाबत 'माझा कट्टा'वर केलेल्या वक्तव्यानंतर, राज्यभरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.


शरद पवारांचं वलय पाहून गोपीनाथ मुंडेंची जन्मतारीख 12 डिसेंबर ठरल्याची माहिती खुद्द धनंजय मुंडेंनी दिल्याचं अजित पवार यांनी माझा कट्टावर सांगितलं होतं.

अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात गोपीनात मुंडे समर्थकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

मात्र स्वत: गोपीनाथ मुंडे यांनीच त्यांच्या एकसष्ठीच्या कार्यक्रमात आपल्या जन्मतारखेबाबत सांगितलं होतं.

गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते?

"माझ्या वयाबाबत मलाच माहीत नाही. माझे वडील आणि आई अंगठेबहाद्दर होते. शाळेत गेल्यावर माझ्या शिक्षकांनी जे लिहिलं, तेच माझं वय आहे. त्यामुळे माझी कुंडली बघून माझं भविष्य बघत असाल, तर ते तुम्हाला कधीच सापडणार नाही. कारण ते माझं खरा जन्मच नाही, त्यामुळे हा लोकांसाठी जन्म आहे. हल्ली राजकारणी विरोधकांच्या कुंडल्यासुद्धा एकमेकांच्या पाहतात, इथपर्यंत राजकारण गेलेलं आहे. माझी कुंडली झाली ती आणी-बाणीतून. जयप्रकाशजींच्या चळवळीत गेलो, 16 महिने कारावासात गेलो, म्हणून मी राजकारणात आलो, राजकारण चालत गेलं, मी चालत गेलो"



अजित पवार 'माझा कट्टा'वर काय म्हणाले?

गोपीनाथ मुंडे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या दोघांचाही वाढदिवस 12 डिसेंबरला असल्याचा सार्वत्रिक समज आहे. मात्र तपशील काढून पाहिल्यास मुंडेंनी जन्मतारीख बदलल्याचं समजेल, असं अजित पवार ‘माझा कट्टा’वर म्हणाले होते. ही माहिती खुद्द गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिल्याचं अजित पवारांनी सांगितलं होतं.

पवारांच्या घरात संस्काराची कमी : पंकजा मुंडे

यावर प्रतिक्रिया देताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “ही गोष्ट धक्कादायक आहे. सोशल मीडियामार्फत हा विषय माझ्यापर्यंत पोहोचला. ‘माझा कट्टा’वर जाणाऱ्या व्यक्तीने काय बोलावं हा विषय एका उंचीचा असावा. पण मला अजित पवारांवर विश्वास आहे, कारण ते स्पष्ट बोलतात. त्यामुळे माझे बंधू धनंजय मुंडेंनीच त्यांना हे सांगितलं असावं.”

दुसरीकडे मला याबाबत काहीही बोलायचं नाही, असं सांगत धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या जन्मतारीख वादाबाबत बोलण्यास नकार दिला आहे.

मनमोहन सिंहांनी मुंडेंना काँग्रेसमध्ये घेतलं नाही, अजित पवारांचा गौप्यस्फोट

अजित पवारांचं वक्तव्य कुटुंबीयांसाठी वेदनादायी
गोपीनाथ मुंडेंना जर जन्मतारीख बदलायची असती, तर अटल बिहारी वाजपेयी यांची जन्मतारीख लावली असती. अजित पवारांचं हे वक्तव्य माझ्या कुटुंबीयांसाठी वेदनादायी असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.

पवारांच्या घरी संस्काराची कमी
पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी नेहमी शरद पवार यांचा आदर, सन्मान केला आहे. हा माझ्या संस्काराचा भाग आहे. पण अजित पवार यांच्या वक्तव्यावरुन पवारांच्या घरात संस्काराची कमी असल्याचं दिसतं.”

“गोपीनाथ मुंडेंनी जन्म तारीख बदलल्याचा आरोप धादांत खोटा”

काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल मुंडेंची माझ्याशी चर्चा नाही
तसंच गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल माझ्याशी कधीच चर्चा केली नाही. आमदार असताना मी त्यांच्यासोबत दिल्लीलाही गेले नाही, असा दावाही पंकजा यांनी केला आहे.