मुंबई : शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुंबईतल्या प्रसिद्ध कायदे महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया बार काऊन्सिल ऑफ इंडियाने रद्द केली आहे. यामध्ये शासकीय कायदे महाविद्यालय (जीएलसी), केसी महाविद्यालय, जी. एल. अडवाणी महाविद्यालय यांचा समावेश आहे.


शिक्षकांची भरती करताना बार काऊन्सिलने आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन केल्याने महाविद्यालयांना आर्थिक दंड ठोठावण्यात आला होता. त्यातच काही महाविद्यालयांमध्ये पुरेसा शिक्षकवर्ग नसल्याचंही समोर आलं होतं. यावर कारवाई करताना बार काऊन्सिलने या महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रियाच रद्द केली.

 

माटुंग्याचं न्यू लॉ कॉलेज, सिद्धार्थ कॉलेज यांनाही काऊन्सिलने दंड ठोठावला आहे. पुढील सहा दिवसात न्यू लॉ कॉलेजला 19.5 लाख, सिद्धार्थ कॉलेज आणि आंबेडकर कॉलेजला प्रत्येकी 7.5 लाख तर लॉर्ड्स कॉलेजला 9.5 लाख रुपये दंड भरण्याचे आदेश आहेत. या कारवाईविरोधात महाविद्यालयांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला असला तरीही महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होऊ शकतो.