मुंबई : राज्यपालांनी लोकायुक्तांना प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची मुंबईतील एमपी मिल कम्पाऊंड प्रकरणी चौकशी करण्याची समंती राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे मागण्यात आली होती. त्यानुसार राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश मेहतांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र प्रकाश मेहता आमदार असल्याने लोकायुक्तांकडून चौकशी होण्याअगोदर राज्यपालांची संमती आवश्यक होती. मुख्यमंत्र्यांनी संमती देण्यासाठी राज्यपालांना विनंती केली होती.

प्रकाश मेहतांवर आरोप काय?


मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात एफएसआय घोटाळा केल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर आहे. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप होत आहे.

3K च्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता.

पण मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता.

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांचा पारदर्शक कारभार कुठे आहे?: धनंजय मुंडे

सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे

विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता

मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री

‘माझा’च्या बातम्यांवर सभागृहात घमासान, प्रकाश मेहता-मोपलवारांना हटवण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश