मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तातडीने अटक करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. दमानिया यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून खडसेंच्या अटकेची मागणी केली आहे.
एकनाथ खडसे यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ अंजली दमानिया यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
मुक्ताईनगरमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात एकनाथ खडसेंनी आपल्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरली. त्यांच्यावर कलम 354 अंतर्गत कारवाई करत तातडीने अटक करावी, अशी मागणी दमानिया यांनी पत्रात केली आहे.
"मुक्ताईनगरमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाजप आमदार एकनाथ खडसे यांनी माझ्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचं काही शुभचिंतकांनी मला सांगितलं. मला तेव्हाच तक्रार करायची होती, पण पुरावे नव्हते. मला आताच तो व्हिडीओ सापडला आहे. एकनाथ खडसेंनी वापरलेली भाषा ऐकून मला फार संताप आला.
खडसेंने माझ्याविरोधात आक्षेपार्ह भाषा वापरण्याची ही तिसरी वेळ आहे. यावेळी त्यांनी महिलांचा अपमान केला आहे. मी अतिशय नाराज असून त्यांना कलम 354 अंतर्गत तातडीने अटक करावी, अशी माझी मागणी आहे. या तक्रारीसोबत मी व्हिडीओ पाठवत आहे," असं अंजली दमानिया यांनी पत्रात लिहिलं आहे.
मी कोणाचा अवमान केला नाही : खडसे
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी अंजली दमानियांचे आरोप फेटाळले आहेत. मी कोणाचा अवमान केला नाही तसंच मी कोणाचंही नाव घेतलं नाही, अशी प्रतिक्रिया खडसे यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली.
पाहा व्हिडीओ
https://twitter.com/anjali_damania/status/905153896301162496