मुंबई : राज्यात 75 हजार जागांची भरती करण्यात येणार असल्याची राज्य सरकारच्यावतीने (Government) काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली. इतकचं नव्हे तर तलाठी (Talathi) आणि आरोग्यसेवकांच्या भरतीची प्रक्रिया सुरु देखील करण्यात आलीये. परंतु एकीकडे ही प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे शासनाच्यावतीने कंत्राटी तत्वावर नियुक्त्यांची प्रक्रिया देखील सुरु झाली. इतकंच नाही तर त्यासाठी काही खाजगी कंपन्यांना कंत्राट देखील देण्यात आलं. त्यामुळेच आता राज्यभरातील युवक वर्गात आक्रोश निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. 


राज्यात आता लवकरच कंत्राटी तत्वावर नोकर भरती करण्यात येणार आहे. त्याचसाठी आता राज्यशासनाच्या वतीने जीआर देखील काढण्यात आलाय. तर यासाठी एकूण नऊ कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं. याच कंपन्यांच्या माध्यमातून तब्बल 86 संवर्गातील जागा भरण्यात येणार आहेत.  


कोणत्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं?


1) अँक्सेंट टेक सर्व्हिसेस लिमिटेड


2) सी.एम.एस. आयटी सर्व्हिसेस प्रा.लि.


3) सी.एस.ई.- गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि.


4) इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि.


5) क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा.लि.


6) एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल लि.


7) सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा.लि


8) सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा.लि


9) उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा.लि.


कशी असेल भरती प्रक्रिया ? 


राज्यशासनाच्या जीआरमध्ये प्रामुख्याने शासन विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, कृषी महाविद्यालये अशा प्रमुख विभागांचा समावेश आहे. तसेच ही भरती पाच वर्षांसाठी असणार आहे. या भरतीला कोणतेही आरक्षण लागू होणार नसून सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यामध्ये 23 हजार ते 2 लाख रुपयांपर्यंतचे पगार असलेल्या पदांची भरती प्रक्रिया असेल. 


कंत्राटी भरती प्रक्रियेला विरोध


या भरतीप्रक्रियेत ज्या कंपन्यांची निवड करण्यात आलीये त्यामध्ये सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी आणि क्रिस्टल इंटग्रेटेड सव्हिर्सेस या दोन कंपन्या भाजपच्या नेत्यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला होता. तर या भरती प्रक्रियेला तरुणांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येतोय. तसेच स्पर्धा परीक्षा समन्यवय समितीकडून देखील या भरती प्रक्रियेला विरोध करण्यात येत आहे. या सगळा विरोध पत्कारुन सरकारने ही कंत्राटी भरतीची प्रक्रिया सुरु केलीये. त्यामुळे आता ही कंत्राटी भरती सुरळीत पार पडते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


राज्यात सुरु असलेल्या या भरती प्रक्रियेवरुन नांदेड, अमरावती, जालना, वर्धा, यवतमाळ याठिकाणी जोरदार आंदोलने सुरु आहेत. मुंबईत देखील लवकरच हा वणवा पेटताना पाहिला मिळणार आहे. त्यामुळे काही राजकीय व्यक्तींच्या फायद्यासाठी सरकार हा निर्णय रेटून नेणार की कंत्राटी तत्वावर सुरु असलेली भरती प्रक्रिया थांबवणार हे लवकरच स्पष्ट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


हेही वाचा : 


Government Job Recruitment : जागा 35 हजार अन् अर्ज 27 लाखांवर, तीन विभागांच्या भरतीमधून 266 कोटींचे शुल्क जमा